Bhimrao Dhonde Pudhari
बीड

Mahesh Sugar Factory | महेश साखर कारखान्यातून कोट्यवधींची मशिनरी चोरी; माजी आ.भीमराव धोंडे यांचा गौप्यस्फोट

संशयितांची नावे निष्पन्न; लवकरच गुन्हे दाखल होणार

पुढारी वृत्तसेवा

Ashti Mahesh Sugar Factory machinery theft case

कडा: आष्टी तालुक्याची ‘कामधेनू’ म्हणून ओळख असलेला आणि अनेक वर्षांपासून बंद असलेला कडा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली वेग घेत असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारखान्याच्या आवारातून तब्बल कोट्यवधी रुपयांची महागडी मशिनरी चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील संशयितांची नावेही निष्पन्न झाली असून,लवकरच पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केला. आष्टी येथील भगवान महाविद्यालयात बुधवारी (दि.१) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अशोक साळवे उपस्थित होते. माजी आ.धोंडे यांनी कारखान्याच्या उभारणीचा प्रवास,आलेल्या अडचणी आणि सध्याची स्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली.

ते म्हणाले की, आष्टी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आर्थिक,प्रशासकीय आणि तांत्रिक अडथळ्यांवर मात करत प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून,येत्या गाळप हंगामात कारखान्याचे धुराडे पेटतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या प्रकल्पामुळे शेतकरी, वाहतूकदार, पूरक उद्योग आणि स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, तालुक्याच्या अर्थचक्राला गती मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कोट्यवधींच्या चोरीने खळबळ; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

कारखान्याचे काम वेगाने सुरू असतानाच अज्ञात चोरट्यांनी अत्यंत महागडी आणि जड मशिनरी चोरी केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.ही चोरी लाखोंची नसून थेट कोट्यवधी रुपयांची असल्याचे सांगण्यात आले.विशेष म्हणजे,या प्रकरणातील संशयितांची नावे समोर आली असून, त्यांच्याविरुद्ध लवकरच पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली जाणार आहे.

या घटनेमुळे कारखान्याच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर मशिनरी चोरीला जाणे ही गंभीर बाब मानली जात असून, सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी संचालक मंडळ,शेतकरी आणि नागरिकांकडून जोर धरत आहे.या चोरीमुळे कामाच्या गतीवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता असली तरी नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही धोंडे यांनी स्पष्ट केले.

चोरी झाली तरी ‘कारखाना सुरू होणारच’ – माजी आ. धोंडे यांचा निर्धार

महेश सहकारी साखर कारखाना हा या भागातील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. अनेक संकटांना सामोरे जात हा प्रकल्प उभा राहत आहे.मशिनरी चोरीच्या घटनेमुळे आम्ही खचणार नाही.कोणत्याही परिस्थितीत येत्या हंगामात गाळप सुरू करून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करूच, असा ठाम निर्धार माजी आ. भीमराव धोंडे यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT