शहाजी आवारे  Pudhari
बीड

Beed Farmer Death | बैल पोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्याचा मृत्यू; बैलांना अंघोळ घालून कडबा कुट्टी करताना विजेचा धक्का

आष्टी तालुक्यातील चिखली गावावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

Ashti Chikhali Farmer Dies Electric Shock

कडा : बळीराजाचा सर्जा-राजाशी असलेला जिव्हाळा अधोरेखित करणाऱ्या पोळा सणाच्या दिवशीच आष्टी तालुक्यातील चिखली येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.बैलांना अंघोळ घालून पूजा करण्याची तयारी सुरू असतानाच जनावरांसाठी कडबा कुट्टी करताना विजेचा जोरदार धक्का बसून शहाजी लक्ष्मण आवारे (४४, रा. चिखली) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेने आवारे कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

सकाळी बैलांना अंघोळ घातली अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, पोळा सणानिमित्त बुधवारी बैलांची खांदा मळणी करण्यात आली होती. गुरुवारी (दि.१० सप्टेंबर) सकाळी शहाजी आवारे यांनी घरासमोरील अंगणात आपल्या सर्जा-राजाला प्रेमाने अंघोळ घातली. त्यानंतर पूजेची तयारी सुरू असताना जनावरांना चारा टाकण्यासाठी ते घराजवळील कडबा कुट्टी मशीनकडे गेले.

मशीन सुरू करताच विजेचा धक्का...

सकाळी साडेआठच्या सुमारास आवारे यांनी कडबा कुट्टी मशीन सुरू केले.याचवेळी मशीनच्या वायरमधून अचानक विद्युत प्रवाह उतरला.विजेचा तीव्र धक्का बसल्याने ते जागीच कोसळले.कुटुंबीय व शेजाऱ्यांनी तातडीने वीजपुरवठा खंडित करून त्यांना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

कुटुंबाचा कर्ता आधार हरपला....

शहाजी आवारे हे मनमिळाऊ आणि कष्टाळू शेतकरी म्हणून गावात परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ व भावजय असा परिवार आहे. घरचा कर्ता आधार अचानक हिरावल्याने कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी दुपारी चिखली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोळ्याचा आनंद क्षणात दुःखात बदलला..

सकाळी ज्या बैलांना प्रेमाने अंघोळ घालून सणाचा आनंद साजरा करण्याची तयारी केली, त्याच दिवशी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आवारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सणाचा आनंद क्षणात शोकात बदलल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.

कृषी यंत्रसामग्री वापरताना काळजी घ्या, विद्युत महामंडळाचे आवाहन...

कडबा कुट्टी मशीन, पाण्याचे पंप तसेच अन्य विद्युत उपकरणे सुरू करण्यापूर्वी त्यांच्या वायरी, जोडणी व अर्थिंगची तपासणी करून घ्यावी. विद्युत उपकरणांमध्ये बिघाड किंवा वीजप्रवाह उतरल्याचा संशय असल्यास स्वतः दुरुस्ती न करता महावितरणच्या अधिकृत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.ओल्या हाताने विद्युत उपकरणांना स्पर्श करू नये. शेतकऱ्यांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात,असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT