सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले  Pudhari
बीड

Beed Protest | बीड जिल्ह्यातील आश्रमशाळांतील कथित गैरव्यवहाराविरोधात सामाजिक न्याय भवनासमोर निदर्शने

संस्थाचालकांच्या मनमानीचा आरोप; उच्चस्तरीय ऑडिट, ऑनलाइन हजेरी आणि दोषींवर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Beed Ashram School Corruption

बीड : बीड जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या आश्रमशाळांमधील कथित अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक पिळवणुकीच्या विरोधात सोमवारी (दि.२७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासमोर निदर्शने करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

डॉ. ढवळे यांनी आरोप केला की, जिल्ह्यातील ४५ आश्रमशाळांमध्ये सुमारे ७५० शिक्षक व कर्मचारी कार्यरत असून अनेक संस्थांमध्ये संस्थाचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. काही ठिकाणी अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि शिक्षक अशी महत्त्वाची पदे एकाच कुटुंबातील सदस्यांकडे असल्याने आश्रमशाळांचा कारभार खासगी संस्थांप्रमाणे चालविला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रमुख मागण्या

उच्चस्तरीय ऑडिट व ऑनलाइन हजेरी : सर्व आश्रमशाळांचे स्वतंत्र उच्चस्तरीय समितीमार्फत विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे. तसेच पारदर्शकता वाढविण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन हजेरी प्रणाली सुरू करावी.

अंथरवणपिंप्री तांडा प्रकरणाची चौकशी : गेवराई तालुक्यातील अंथरवणपिंप्री तांडा येथील आश्रमशाळेतील महिला कर्मचारी सुरेखा विष्णू चव्हाण यांना कायदेशीर वेतनाची मागणी केल्यामुळे मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप करण्यात आला. तसेच त्यांच्या पतीला संस्थेच्या सचिवांनी मारहाण केल्याचा आरोप करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

वडझरी आश्रमशाळेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी : पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील आश्रमशाळेत पटसंख्या, शिक्षक मान्यता, वेतन अपहार आणि शासनाची कथित फसवणूक याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

सहाय्यक संचालकांवर कारवाई : संस्थाचालकांची कथित पाठराखण करून कारवाईस विलंब होत असल्याचा आरोप करत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या बीड येथील सहाय्यक संचालकांवर प्रशासकीय कारवाई करून संबंधित प्रकरणांची तटस्थ चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, शेख मुबीन, शिवशर्मा शेलार, हनुमान घोडके, किष्किंधा पांचाळ, बाळासाहेब मोरे पाटील, माजी सैनिक अशोक येडे, प्राचार्य डी. जी. तांदळे, नितीन जायभाये, बाजीराव ढाकणे, सुहास जायभाये, डॉ. संजय तांदळे, किसन पुंड, धनंजय सानप, बी. एच. पवार, आर. डी. जमजाळ, संजय जायभाये, अशोक सानप, मच्छिंद्र आंधळे, राहुल थिटे, प्रदीप नेवळे, कालिदास वनवे, सतीश राठोड यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT