बोगस राजमा बियाणे देऊन अंबाजोगाईच्या व्यापाऱ्याला १३ लाखांचा गंडा  file photo
बीड

Beed Fraud Case : बोगस राजमा बियाणे देऊन अंबाजोगाईच्या व्यापाऱ्याला १३ लाखांचा गंडा

६ संचालकांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

अंबाजोगाई : राजमा बियाणे पुरवठा करण्याच्या नावाखाली अंबाजोगाई येथील एका बियाणे व्यापाऱ्याची १२ लाख ८० हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात साताऱ्यातील 'येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी'च्या ६ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई येथील सुयश प्रेमचंद मुथा (रा. गुरुवार पेठ, अंबाजोगाई) हे बियाणे व्यवसायाचे काम पाहतात. जुलै २०२५ मध्ये साताऱ्याच्या 'येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी'चे संचालक संजय बाबासाहेब भगत आणि ओंकार संजय भगत यांनी मुथा यांची भेट घेऊन त्यांना राजमा बियाण्याचे उच्च दर्जाचे नमुने दाखवले होते. त्यानुसार मुथा यांनी २१ जुलै २०२५ रोजी एकूण ८५ टन राजमा खरेदीचा करार केला आणि आरटीजीएसद्वारे वेळोवेळी रक्कम जमा केली. करारानुसार ठरलेला माल तपासण्यासाठी मुथा साताऱ्याला गेले असता, तिथे दाखवल्याप्रमाणे चांगल्या दर्जाचा माल उपलब्ध नव्हता. तडजोड म्हणून त्यांनी २५ टनाची नवीन ऑर्डर दिली आणि एकूण २६ लाख ३१ हजार रुपये जमा केले. मात्र, संशयितांनी ३० ऑगस्ट २०२५ रोजी केवळ १२ टन माल पाठवला, जो अत्यंत निकृष्ट दर्जाचा होता. त्यामध्ये भेसळ, माती आणि पेरणीसाठी अयोग्य साहित्य मोठ्या प्रमाणात होते.

उर्वरित मालासाठी किंवा पैसे परत मिळवण्यासाठी मुथा यांनी वारंवार संपर्क केला असता, आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला आणि अर्वाच्य भाषेत उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुयश मुथा अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संजय बाबासाहेब भगत, ओंकार संजय भगत, अरविंद सोपान विधाते, सारीका सोमनाथ शिंदे, बालुताई सोमनाथ जगताप आणि बालकृष्ण पंढरीनाथ चव्हाण या ६ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT