Beed Ambajogai shop fire
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील मंडी बाजार परिसरातील प्रगती शॉपिंग मॉल फेमस फर्निचर होम अप्लायन्सेस या दुकानांना आज (दि.१२) सकाळी सहाच्या सुमारास भीषण लाग लागली. ही आग इतकी मोठी होती की दुकानातील सर्वच्या सर्व माल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून त्या संपूर्ण मालाचा जळून कोळसा झाला होता. प्रथम दर्शनी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे.
अंबाजोगाई शहरातील मंडी बाजार परिसरातील अमन ज्वेलर्स च्या पाठीमागे फयाज मोईन यांचे संसारोपयोगी तथा गृहोपयोगी वस्तूंचे दुकान होते. या दुकानात प्लास्टिक, फायबर, लोखंडी तसेच कागदी तथा कपड्यांच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत्या. सकाळी सहाच्या सुमारास या दुकातून धूर येत असल्याचे प्रत्यक्ष दर्शीकडून बोलल्या जात होते. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने या दुकानातून आगीचे तसेच धुराचे लोट बाहेर पडू लागले.
दुकान मालक घरून दुकानात येईपर्यंत दुकानातील सर्वच्या सर्व मालाची राखरांगोळी झाली होती. अंबाजोगाई नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून अग्निशमन दलाच्या जवानांनी ही भडकलेली आग आटोक्यात आणली. पुढील आसपासच्या दुकानात ही आग पसरण्याआधीच त्यावर नियंत्रण मिळवले. या आगीमुळे फैयाज मोमीन यांचे अतोनात नुकसान झाल्याने त्यांच्यावर भलेमोठे आर्थिक संकट ओढवले आहे.