अंबाजोगाई :- अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्यावरील पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामादरम्यान स्लॅब भरत असताना विजेचा तीव्र धक्का लागून दोन कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंभीर अवस्थेत दोघांना स्वाराती रुग्णालयात नेले असतांना त्यांना मृत घोषित करण्यात आले. ही भीषण घटना शनिवार दि १२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
ऐन सणासुदीच्या दिवसांत घडलेल्या या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यशवंत (खंडू) कोंडीराम वाघमारे (वय ३३, रा. मंगळवार पेठ, चांभार गल्ली) आणि बबन चंद्रकांत वाघमारे (वय ५०, रा. मंगळवार पेठ, चांभार गल्ली, अंबाजोगाई) अशी मृत कामगारांची नावे आहेत. दररोज प्रमाणे कामावर निघालेल्या कामगारांना काळाने गाठले.
कामावर जातो असे सांगून घरातून आनंदाने डबा घेऊन निघालेल्या या मजुरांवर अचानक काळाने झडप घातली. मृत यशवंत वाघमारे यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. साधारण दीड वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले होते. त्यामुळे घरचा एकमेव कर्ता पुरुष यशवंत उर्फ खंडूच्या दुर्दैवी मृत्यूने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बबन वाघमारे हे निष्णात ड्रायव्हर होते. वाढत्या महागाईत कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाल्याने ते सुट्टीच्या दिवशी सेंट्रींगचे काम करत असत. त्यांच्या पच्यात देखील आई वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे.त्यांच्यादेखील कुटुंबातील कमावत्या कर्त्या पुरुषांचा असा अचानक अंत झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्राप्त माहितीनुसार मुख्य रस्त्यावरील भिसे यांच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू असून याच बांधकामाच्या दुसऱ्या मजल्याच्या स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. यासाठी स्लॅब भरण्यासाठी मोठी मशीन (काँक्रीट मिक्सर) लावण्यात आली होती. याच मशिनद्वारे स्लॅब भरण्यासाठी हे कामगार कामावर होते. ज्या ठिकाणी काँक्रीट मिक्सरद्वारे स्लॅब भरण्याचे सुरू होते, तिथूनच ३३ केव्ही व स्ट्रीट लाईट अशा दोन मुख्य विद्युत वाहिन्या गेल्या आहेत.
या विद्युत वाहिन्यांचा विद्युत पुरवठा खंडित न करता व सुरक्षेची योग्य खबरदारी न घेता काम सुरू ठेवण्यात आल्याने हा भीषण अपघात घडल्याचे बोलले जात आहे. मात्र या दुर्घटनेला नक्की जबाबदार कोण हे तपासातून निष्पन्न होईलच मात्र दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. घडलेली दुर्घटना समजताच स्वा रा ती रुग्णालयात मोठा जनसमुदाय तथा परिवाराचा आक्रोश आढळून आला.
घडलेल्या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिस निरीक्षक शरद जोगदंड तत्काळ घटनास्थळी येऊन परिस्थिती अत्यंत शिताफीने हाताळली. दोन्ही मृतदेह उत्तरस्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयात मृतांचे नातेवाईक , मित्र परिवार, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी तळ ठोकून आहेत. दरम्यान काँक्रीट मशीनचा वाहनचालक विश्वनाथ चव्हाण (झारखंड) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.