अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील मध्यवर्ती भागात परळी रोडवरील बस डेपोजवळील अण्णाभाऊ साठे चौकातील एटीएम केंद्र फोडून रोकड लंपास करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. मात्र, एटीएममधील अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली, मजबूत लॉक यंत्रणा आणि सायरनमुळे चोरट्यांचा डाव फसला. मशीनची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करूनही त्यांना रोकड हस्तगत करता आली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन अज्ञात चोरटे एटीएम केंद्रात घुसले. त्यांनी शटरमधील लॉक तसेच एटीएम मशीनचे बाह्य कव्हर फोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुमारे अर्धा तास त्यांनी मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतील सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्याने मशीन उघडण्यात त्यांना अपयश आले आणि अखेर ते रिकाम्या हाताने पसार झाले.
एटीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा अलर्ट संबंधित कंपनीला मिळताच चॅनल एक्झिक्युटिव्ह भिमराव अंबादास बलखंडे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता, एटीएमचे बाह्य आवरण तुटलेले, लॉक खराब झाल्याचे आणि मशीनवर तोडफोड झाल्याचे दिसून आले. मात्र, मशीनमधील संपूर्ण रोकड सुरक्षित असल्याची खात्री झाली.
एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरीचा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. फुटेजमध्ये दोन अज्ञात तरुण हातात हत्यारे घेऊन एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना स्पष्टपणे दिसत आहेत. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
भिमराव अंबादास बलखंडे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार प्रकाश गायकवाड हे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या धाडसी चोरीच्या प्रयत्नामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या दोन्ही आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास अंबाजोगाई शहराचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी व्यक्त केला आहे.