गौतम बचुटे
केज: केज-कळंब रोडवरील साळेगावजवळ ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. अन्य एकजण किरकोळ जखमी झाला आहे.
रविवारी (दि.२६ ऑक्टोबर) रात्री ८:१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संतोष ठोंबरे आणि सुरज काकडे (मोटार सायकल क्र. एम एच,-४४/वाय- २५७७) हे दोघे साळेगावकडून केजच्या दिशेने जात असताना, साळेगावजवळ तेलंग आणि दत्तात्रय आरडकर यांच्या शेताजवळ असलेल्या पुलावर कळंबच्या दिशेने येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या धडकेमुळे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटून त्यांनी त्यांच्या पुढे चाललेल्या शिवानंद स्वामी यांच्या मोटारसायकललाही धडक दिली.
या भीषण अपघातात संतोष ठोंबरे आणि सुरज काकडे हे दोघेही जखमी झाले. सुरज काकडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. शिवानंद स्वामी यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पुढारीच्या केज प्रतिनिधींनी रुग्णवाहिकेसाठी तातडीने संपर्क साधला. त्यानंतर वळसे पाटील यांच्या दोन खाजगी रुग्णवाहिकांच्या मदतीने गंभीर जखमी झालेले संतोष ठोंबरे आणि सुरज काकडे यांना पुढील उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.