बीड

Beed Accident | जनावरे घेऊन जाणाऱ्या भरधाव पिकअपची व्यायाम करणाऱ्या मुलांना धडक; दोघे जखमी

पुढारी वृत्तसेवा

नेकनुर : अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंभा–पाटोदा मार्गावरील मुळुकवाडीजवळ गुरुवारी सकाळी साडेपाच सहाच्या सुमारास कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या पिकअपने रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असलेल्या दोन शाळकरी मुलांना जोरदार धडक दिली. या अपघातात ईश्वर गणेश ढगारे (वय १६) आणि राज बिरूदेव ढगारे (वय १६) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-१६ डीपी-२२४५ क्रमांकाची गाडी कत्तलीसाठी जनावरे वाहून नेणारी पिकअप भरधाव वेगात जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर पिकअप रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन पडली. वाहनात मोठ्या प्रमाणात जनावरे असल्याची माहिती असून त्यांनाही दुखापत झाल्याचे समजते.

अपघातानंतर माजी सरपंच कृष्णा पितळे यांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.अपघाताची माहिती नेकनूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांना मिळताच घटनास्थळी सहा. फौ. विठ्ठल राठोड व हेड कॉन्स्टेबल अविनाश घुंगरड हे दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करत , जखमी गाईंना वैद्यकीय उपचारासाठी गोशाळेत पाठवले .

जखमी विद्यार्थ्यांपेक्षा चालकांना पळविण्यास प्राधान्य? ग्रामस्थांचा संताप

अपघातानंतर घटनास्थळी आलेल्या स्विफ्ट कारमधून संबंधित चालकांना घेऊन जाण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विद्यार्थी गंभीर जखमी अवस्थेत असताना त्यांना मदत करण्याऐवजी चालकांना घटनास्थळावरून पळवून नेण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट पसरली. संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT