परळी वैजनाथ : परळीपासुन काही अंतरावर टोकवाडी- नागापूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार एका तरुण आरोग्य कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१७) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे
टोकवाडी ते नागापूर रस्त्यावर झालेल्या एका भीषण अपघातात संतोष गणपतराव गुट्टे वय ४४ (ह. मु. शक्तीकुंज वसाहत,परळीवैजनाथ) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मयत संतोष गुट्टे हे आरोग्य विभागात कुष्ठरोगतज्ञ म्हणून कार्यरत होते. तर कन्हेरवाडी हे त्यांचे आजोळ आणि सासर होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांचा पश्चात आई ,वडील ,दोन बहीणी ,पत्नी,दोन मूलं असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गुट्टे हे नागापूर येथे काम आटोपून मोटरसायकल वरून थर्मल कॉलनीकडे परतत होते. दरम्यान, नागापूर-टोकवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांचे पोलीस उपनिरीक्षक सारोळे व जमादार मच्छिंद्र कप्पे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. नागापूर_ टोकवाडी या मार्गावर आधीच विनापरवाना वीटभट्ट्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने या मार्गाची अक्षरशः दैना झाली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे परंतु या समस्याकडे कोणीही लक्ष देत नाही.