बीड

Beed Accident | केज-मांजरसुंबा रोडवर भीषण अपघातात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू, पाच जनावरेही दगावली: पिक-अपला टिप्परची धडक!

जोला-सारुळ पाटीवर जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिक-अपला टिप्परची धडक, टिप्पर चालक आणि क्लिनर गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

केज:- केज मांजरसुंबा रोडवर केज पासून २० किमी अंतरावर जोला-सारुळ पाटीवर जनावरांची वाहतूक करणारे पिक-अप आणि टिप्परची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातातील पीक-अप मधील दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. तर टिप्पर चालक आणि त्याच्या सोबत असलेल्या उत्तर प्रदेशातील क्लिनर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात पिकमधील पाच जनावरेही ठार झाली आहेत.

दि. ११ ऑक्टोबर, रविवार रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास नेकनुर येथील आठवडी बाजारातून जनावरे घेऊन येत असलेले पिक-अप क्र. (एम एच ४४/ यू ४३०७) हे अंबाजोगाई च्या दिशेने येत असताना केज मांजरसुंबा रोडवर असलेल्या रेणू पेट्रोल पंपाच्या जवळ जोला-सारुळ पाटी जवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव वेगातील टिप्पर क्र. (एम एच ४४/ यू ९५५७) ने जोराची धडक दिली. यात पिकअप मध्ये समोर केबिनमध्ये बसलेले हनीफ शौकत कुरेशी, वय (२० वर्ष) आणि त्याचा भाऊ आरेफ शौकत कुरेशी, वय (२० वर्ष) (रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई) या दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात पिक-अपचा चकनाचूर झालेला असून टिप्पर चालक अमोल खंदारे, (रा. कारेगव्हाण ता. वडवणी) आणि उत्तर प्रदेशातील क्लिनर, पप्पू यादव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

दोघा भावांचा एकाचवेळी दुर्दैवी मृत्यू :

- अपघातात मृत्युमुखी पडलेले हनीफ शौकत कुरेशी आणि आरेफ शौकत कुरेशी हे दोन सख्खे तरुण भाऊ मृत्यूमुखी पडल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाता नंतर हनिफ कुरेशी याचे प्रेत केज येथील उपजिल्हा रुग्णालयात तर आरेफ कुरेशी याचे प्रेत नेकनुर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले आहे.

जखमींना जेसीबीने बाहेर काढले :

अपघातात टिप्पर मध्ये अडकलेला चालक अमोल खंदारे आणि क्लिनर पप्पू यादव यांना जेसीबी च्या सहाय्याने केबिनला दरवाजा उघडून बाहेर काढले. त्या नंतर दोन्ही जखमींना बीड येथील रेणू हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले असून दोघे गंभीर जखमी आहेत.

अपघाताची माहिती केज पोलिस ठाण्यात मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, शिवाजी कागदे, नितीन वारे, शेख पाशा आणि गृह रक्षक दलाचे जवान हे तात्काळ अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने जेसीबीच्या सहाय्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

पाच जनावरे दगावली - अपघातात पिक अप मधील पाच गो वंशीय प्राण्यांचा देखील जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती देताना अपघात स्थळा पासून सुमारे अर्धा किमी अंतरावर असलेल्या हॉटेल चालकांनी सांगितले की, अपघात झाल्याचा प्रचंड मोठा आवाज झाला. त्या नंतर त्यांनी बाहेर येऊन पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT