गौतम बचुटे
केज : केज-मांजरसुंबा रोडवर सोमवार रोजी मध्यरात्री २:३० वा. च्या सुमारास केजपासून जवळ सांगवी-सारणी वळणावर एक ट्रॅव्हल्स बस पलटी झाली आहे. बस पलटी होताच बसने पेट घेतला. या अपघातात २८ प्रवाशी जखमी झाले आहेत.
जळगावहून लातूरकडे जात असलेली भरधाव वेगातील खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस सोमवार (दि. १६ मार्च) मध्यरात्री २:३० वाजण्याच्या सुमारास केज मांजरसुंबा रोडवर असलेल्या सांगवी-सारणीच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. बस मधील जखमी प्रवासी बाहेर पडत असताना बसने पेट घेतला. मात्र सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नाही.
अपघाताची माहिती पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना मिळताच त्यांनी रात्र गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाला माहिती देताच पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इमानदार व चालक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंभुदेव दराडे हे तत्काळ अपघातस्थळी हजर झाले. त्यांनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. पोलिस, रुग्णवाहिका चालक सुमित तेलंग, त्याचे इतर सहकारी आणि गावकऱ्यांच्या मदतीने प्रवाशांना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आले. अपघातात २८ प्रवाशी जखमी झाले आहेत.
अपघात ग्रस्ताने ट्रॅव्हल्स बसने घेतला पेट बस जुळून खाक
बसला अपघातात पलटी झालेल्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी बस मधून जखमी प्रवाशांना बाहेर काढले जात असतानाच घर्षणामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने बसने पेट घेतला आणि गाडीच्या इंधनाची टाकी फूटल्याने आग भडकून बस पूर्णतः जळून खाक झाली. बसने पेट घेतल्याने प्रवाशांचे सामान जळून खाक झाले.
पोलिस आणि रुग्णहिका चालक यांची तत्परता :
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिकाचा चालक व सोबतचे कर्मचारी यांनी अपघातस्थळी तत्काळ हजर होत जखमींना बाहेर काढले.
जखमीवर उपचार सुरू
अपघातील ३८ जखमी प्रवाशांवर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या स्टाफने प्रथमोपचार करून संदर्भीय उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलविले आहे.