Beed News : जोपर्यंत रस्ता नाही, तोपर्यंत मत नाही,१५ गावांचा एकमुखी निर्धार File Photo
बीड

Beed News : जोपर्यंत रस्ता नाही, तोपर्यंत मत नाही,१५ गावांचा एकमुखी निर्धार

लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे जनतेचा संताप उसळला

पुढारी वृत्तसेवा

Beed 15 villages unanimously resolve not to vote until there is a road

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड-नाळवंडी रस्ता गेल्या २० वर्षांपासून अक्षरशः जीवघेणा ठरला आहे. मोठमोठे खड्डे, डांबराचे अवशेष, चिखलाचे दलदल यामुळे हा रस्ता मृत्यूचा महामार्ग बनला आहे. या दुरवस्थेवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संपूर्ण निष्क्रियतेने संतप्त झालेल्या परिसरातील १५ ते १६ गावांच्या ग्रामस्थांनी जोपर्यंत रस्ता नाही, तोपर्यंत मत नाही या घोषवाक्यासह आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर ठाम बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

बीड ते नाळवंडी हा तालुक्यातील प्रमुख मार्ग. पण गेल्या दोन दशकांपासून त्याचं डांबर उखडून गेला आहे. चारचाकी वाहन काय, दोनचाकी सुद्धा या मार्गाने चालवणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणे! प्रत्येक पावसाळ्यात हा रस्ता नदीसमान होतो; रुग्णवाहिका गावात पोहोचत नाही, शाळकरी मुलं चिखलात अडकतात, शेतकऱ्यांचा माल खराब होतो. तरीही संबंधित लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य केवळ आश्वासनं देत राहिले, पण प्रत्यक्ष काम शून्य! ग्रामस्थांनी वारंवार निवेदने दिली, अर्ज केले, बैठका घेतल्या पण सत्ताधाऱ्यांच्या टेबलावर ती पत्रं धूळखात पडली.

काम लवकरच सुरू होईल या गोड बोलांनी ग्रामस्थांना फसवले गेले. आमच्या जीवाशी खेळणारा हा रस्ता प्रत्येक निवडणुकीत विषय बनतो, पण निकाल लागल्यानंतर आमचा आवाज मूक केला जातो, असा संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. अलीकडेच या १५ ते १६ गावांचे ग्रामस्थ एकत्र आले आणि एकमुखी ठरावाने वहिष्कार जाहीर केला. आता नुसती आश्वासनं नाहीत, प्रत्यक्ष काम सुरू झालं तरच मतदान! अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत गावात कोणत्याही उमेदवाराला प्रचार करण्यास प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय घेऊन ग्रामस्थांनी लोकशाही व्यवस्थेलाच धक्का दिला आहे.

मतदारांच्या या ऐतिहासिक बहिष्कारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जोपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण सुरू होत नाही, तोपर्यंत गावात कोणी येऊ नये, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या बहिष्कारामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रिय कारभाराचे लक्तरे सर्वांसमोर आले आहेत. ग्रामस्थ म्हणतात, आम्ही मत देतो, पण बदल काहीच दिसत नाही.

आमचं आयुष्य स्वस्त आहे का? रस्ते नसले, तर विकास कसा होणार? त्यांच्या या प्रश्नांनी स्थानिक सत्ताधाऱ्यांचे मौन अधिकच बेजबाबदार वाटत आहे. लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणाचा निषेध आणि जनतेच्या असंतोषाचा ज्वालामुखी बीड ते नाळवंडी रस्त्याच्या रूपाने पेटून उठला आहे.

आमच्या गावासाठी रस्ता नाही, तर मतदानही नाही! गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही सर्वजण बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत आमचा रस्ता दुरुस्त होत नाही, तोपर्यंत कोणालाही आमच्या गावात प्रचार करण्याची किंवा आमचे मत मागण्याची परवानगी नाही, अशी ग्रामस्थांनी भूमिका घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT