Gevarai election violence case
गेवराई : नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादिवशी गेवराई शहरात झालेल्या पवार–पंडित गटातील राड्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाचे युवा नेते बाळराजे पवार यांना बुधवारी (दि. १७) गेवराई न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मतदानाच्या दिवशी निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीप्रकरणी दाखल गुन्ह्यात कलमवाढ झाल्यानंतर सोमवारी (दि. १५) रात्री बाळराजे पवार यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या सूचनेनुसार ते स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले होते. अटकेनंतर न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
आज न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने बाळराजे पवार यांचा जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्याची बातमी समजताच त्यांच्या समर्थकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून कार्यकर्त्यांनी दिलास्याची भावना व्यक्त केली आहे.
या प्रकरणामुळे गेवराई शहरासह तालुक्यात राजकीय वातावरण तापले होते. बाळराजे पवार यांच्यावर झालेल्या कारवाईकडे अनेकजण राजकीय पार्श्वभूमीवरून पाहत होते. दरम्यान, जामीन मंजूर झाल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे.