बीड : गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांवर तीव्र राजकीय टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते तथा आमदार धनंजय मुंडे गुरुवारी बीडच्या शासकीय विश्रामगृहात आमनेसामने आले. विशेष म्हणजे, दोन्ही नेत्यांनी हसतमुखाने एकमेकांचे हस्तांदोलन करत आपुलकीने विचारपूस केली. या अनपेक्षित भेटीची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
बीड जिल्ह्याच्या नवनियुक्त पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांच्या स्वागतासाठी तसेच विविध प्रशासकीय विषयांवरील चर्चेसाठी खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार धनंजय मुंडे हे दोघेही शासकीय विश्रामगृहात उपस्थित होते. याचवेळी विश्रामगृहाच्या परिसरात दोन्ही नेते समोरासमोर आले.
गेल्या काही महिन्यांत विलास घुले हत्या प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण या मुद्द्यांवरून बीडचे राजकारण चांगलेच तापले होते. या प्रकरणांवरून धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात तीव्र आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील कटुता शिगेला पोहोचल्याचे चित्र निर्माण झाले होते.
मात्र, गुरुवारी या सर्व राजकीय पार्श्वभूमीला छेद देत दोन्ही नेत्यांनी हसतमुखाने हस्तांदोलन केले. "काय मग, कसे आहात?" अशी आपुलकीची विचारपूसही त्यांनी एकमेकांकडे केली. हा क्षण पाहून उपस्थित कार्यकर्ते आणि अधिकारीही काही काळ आश्चर्यचकित झाले.
राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही अनपेक्षित भेट आणि दोन्ही नेत्यांमधील हसतमुख संवाद सध्या बीड जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आता या भेटीला केवळ औपचारिक शिष्टाचार मानायचे की त्यातून भविष्यातील राजकीय समीकरणांचे काही संकेत मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.