ओबीसी आरक्षण संपलं, म्हणत ऑटो रिक्षाचालकाने संपविले जीवन  
बीड

Beed News| ओबीसी आरक्षण संपलं,म्हणत ऑटो रिक्षाचालकाने संपविले जीवन

खिशात सापडली चिठ्ठी; पोलिसांत नोंद

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : आपली दोन मुले पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र, आता आपलं ओबीसीचे आरक्षण संपलं, आपल्या मुलांना नोकरी लागत नाही. त्यांना इतर कामधंदा व्यवसाय टाकून द्यायला आपल्याकडे पैसेही नाहीत, संपत्तीही नाही, शेतीही नाही. आता आपल्या जगण्याला काही अर्थ नाही, अशा विवंचनेतून एका ऑटो चालकाने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना गुरूवारी (दि.२५) परळी तालुक्यातील टोकवाडी येथे घडली. मृताच्या खिशातील चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून ग्रामीण पोलिसात याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, टोकवाडी येथील ऑटो चालक आत्माराम भांगे हे टोकवाडी -परळी प्रवासी ऑटो चालून आपली उपजीविका भागवत असायचे. त्यांना आदित्य व आदर्श अशी दोन मुले आहेत. या मुलांचे शिक्षण झाल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून मुले पोलीस भरतीची तयारी करत होते. मात्र, गेल्या काही दिवसात ओबीसी आरक्षण संपल्याच्या बातम्या व चर्चांना उधान आले आहे. आपली मुले पोलीस भरतीची तयारी करत असून त्यांना नक्कीच नोकरी लागेल, या आशेवर असलेल्या या ऑटोचालकाला आपले ओबीसी आरक्षण संपले या विचाराने ग्रासून टाकले होते. या विचारातूनच गेल्या तीन ते चार दिवसापासून त्यांनी या गोष्टीचा अतिविचार केला. तीन-चार दिवसापासून ते गप्प गप्प राहू लागले होते. तुम्ही का बोलत नाही? असे मुलांनी व घरच्यांनी विचारले. त्यावेळीही त्यांनी याबाबत काही उत्तर दिले नाही.

त्यानंतर अधिक आग्रहाने विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, तुम्ही मुलांनी आता काहीतरी कामधंदे बघा, आता आपल्याला नोकऱ्या लागणे शक्य नाही. आपले आरक्षण संपून गेले आहे .यानंतर त्यांची पत्नी व मुलांनी त्यांना समजावूनही सांगितले होते. परंतु त्यांच्या डोक्यातून आरक्षण संपले हा विषय निघाला नाही. त्यांनी आपल्या एका चुलत भावाजवळ याबाबतची खंत बोलून दाखवली. माझ्या मुलांचे आयुष्य पण माझ्यासारखच ऑटो चालवून जाईल. आपल्याकडे काही संपत्ती, शेती नाही. आता आपलं ओबीसीचे आरक्षण पण संपलेले आहे. त्यामुळे माझी मुलं काही नोकरीला लागत नाहीत अशा प्रकारची चिंता व्यक्त करून दाखवली होती. याच विचारात ग्रासलेले असताना आत्माराम भांगे यांचा मुलगा व पत्नी शेतातील आखाड्यावर दूध काढण्यासाठी गेले असताना त्यांनी घरातील एका रूममध्ये साडीचा गळफास घेऊन जीवन संपविले.

पत्नी व मुलगा घरी परत आल्यानंतर ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. ओबीसी आरक्षण संपल्याच्या धक्क्यातूनच आपल्या वडिलांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती त्यांच्या मुलाने परळी ग्रामीण पोलिसात नोंदवली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या खिशात आपले ओबीसी आरक्षण संपले म्हणून मी जीवन संपवित आहे. अशा प्रकारची चिठ्ठीही आढळून आली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT