Christian conversions Attempt In Wadwani Beed
वडवणी, पुढारी वृत्तसेवा : वडवणी शहरातील कानापूर रोडवरील एका किरायाच्या रूममध्ये ख्रिश्चन धर्मांतराचे रॅकेट चालविल्याचा संशय व्यक्त होत असून, हिंदू संघटनांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. फादर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील वंचित घटकांना पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच, शिवसैनिक आणि इतर हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत हा डाव उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी फादर याचा टॅब, डायरी व इतर साहित्य चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मसनजोगी, भोई, मातंग, महार, वडार, शिकलकरी आदी समाजांतील वंचित घटकांना लक्ष करून ख्रिश्चन धर्मांतर करण्याचे प्रयत्न काही दिवसांपासून सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या प्रकारात फादर व त्यांचे काही सहकारी सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. याबाबत वडवणी येथील हिंदू संघटनांना माहिती होताच घटनास्थळी हिंदू संघटनांचे पदाधिकारी पोहोचले. त्यांनी तात्काळ फादर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पकडून वडवणी पोलिसांच्या ताब्यात दिले.
यानंतर वडवणी पोलिस स्टेशनमध्ये शिवसेना, भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण मंच आणि इतर संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले. त्यांनी ख्रिश्चन धर्मांतर रॅकेटविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी बालू शेनुरे यांनी ख्रिश्चन फादर दिनेश शामवीर लोंढे यांच्यासह इतरांविरोधात वडवणी पोलिसांकडे रीतसर तक्रार केली असून, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
या प्रकरणी वडवणी पोलिसांनी सांगितले की, फादर आणि त्यांचे सहकारी यांच्याकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासानंतर आवश्यक ते पुरावे गोळा करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, शहरात या घटनेमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समाजातील वंचित घटकांना फसवून ख्रिश्चन धर्मांतर करण्याच्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेनंतर सर्व हिंदू संघटनांनी पोलिसांना लेखी निवेदन देऊन अशा प्रकारच्या धर्मांतराच्या हालचालींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.