आठवले गँगची नाशिकच्या कारागृहात रवानगी 
बीड

बीड : आठवले गँगची नाशिकच्या कारागृहात रवानगी

कारागृहातील मारहाणीच्या घटनेनंतर कारागृह प्रशासन सतर्क

पुढारी वृत्तसेवा

बीड : बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली होती. यामध्ये वाल्मीक कराड व सुदर्शन घुले याला मारहाण झाल्याची चर्चेला ऊत आला होता. यानंतर कारागृह प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी (दि.१) सकाळी अक्षय आठवले याच्यासह त्याचे साथीदार नाशिकच्या कारागृहात हलवले आहेत.

संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी बीड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असल्यापासून बीडचे जिल्हा कारागृह वादात अडकले आहे. सोमवारी (दि.३१) सकाळी कैद्यांच्या दोन गटांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली होती. यादरम्यान संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व सुदर्शन घुले याला यामध्ये मारहाण झाल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर कारागृह प्रशासनाने सोमवारी दुपारी याबाबत खुलासा करत वाघमोडे व सोनवणे या दोन कैद्यांमध्ये मारहाण झाल्याचे स्पष्ट केले. यानंतर मंगळवारी सकाळी अक्षय आठवले, मनीष शिरसागर व सवाई या तिघांना नाशिक येथील कारागृहामध्ये हलवण्यात आले. मारहाण घटनेमध्ये अक्षय आठवले याचा सहभाग असल्याची चर्चा होत होती. यादरम्यानच आता आठवलेसह त्याच्या साथीदारांना नाशिकला हलवल्याने याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

महादेव गीते याच्यासह त्याचे साथीदार हर्सूल कारागृहात

बीड जिल्हा कारागृह मारहाणीच्या घटनेनंतर सोमवारी (दि.३१) दुपारी महादेव गीते, मुकुंद गीते, नेहरकर यांच्यासह आणखी एकाला बीड जिल्हा कारागृहातून संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात हलवण्यात आले.

खिंडकर यांच्या जीवाला धोका; पत्नीने दिले पत्र

ओंकार सातपुते या तरुणाला मारहाण केल्याच्या प्रकरणात दादासाहेब खिंडकर बीड जिल्हा कारागृहात होता. त्या ठिकाणी त्याच्या जीवाला धोका असल्याचे पत्र अश्विनी खिंडकर यांनी कारागृह प्रशासनाला दिले होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार खिंडकर याला देखील संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हलवण्यात आले.

कारागृह प्रशासनावर वेगवेगळे आरोप

बीड जिल्हा कारागृहात असलेल्या वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहे. कारागृहातील काही सीसीटीव्ही बंद असून ते का बंद आहेत? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. आमदार सुरेश धस, अंजली दमानिया व इतर काही राजकीय नेत्यांनी कारागृह प्रशासनाबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT