परळी वैजनाथ, : परळी शहरातील पंचशील नगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीवर चाकूने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळा (निजाम) ता.परंडा जि.धाराशिव येथील मुळ रहिवाशी असणारी पिडित तरुणी परळी वैजनाथ येथील पंचशील नगर परिसरात एका रुमवर राहत होती. शुक्रवारी (दि. ५ जून) रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी अनंत पाटलोबा गित्ते (रा. मालेवाडी, ता.परळी वैजनाथ) हा पिडितेच्या घरी गेला.
चारित्र्याच्या संशयावरुन यावेळी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संशयिताने शिवीगाळ करत तू मला का बोलत नाहीस असे म्हणत तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने चाकूने तरुणीच्या उजव्या हातावर, पोटावर तसेच डाव्या हाताच्या दंडावर सपासप वार केले. या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गंभीर जखमी तरुणीचा वैद्यकीय अहवाल (एमएलसी) प्राप्त झाल्यानंतर शनिवारी (दि. ६ जून) दुपारी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 118(2), 118(1), 115(2) आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.