कडा : आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात बिबट्याच्या वावराने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात बिबट्या दिसत असल्याची चर्चा असून, शेतशिवारात त्याच्या पायांचे ठसे आढळून आल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे. काही शेतकऱ्यांनी बिबट्या प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शेतीची कामे करायची कशी आणि जनावरांची देखभाल करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वाहिरा परिसरातील शेतशिवारात काम करत असताना काही शेतकऱ्यांना बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले. दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे सांगण्यात येत असल्याने शेतकरी सावध झाले आहेत. विशेषतः सायंकाळच्या वेळी शेतात जाणे टाळले जात आहे. मात्र, जनावरांना चारा-पाणी देणे, पिकांना पाणी देणे आणि अन्य शेतीकामांसाठी शेतात जाण्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. दिवसा शेतात काम करतानाही शेतकरी सतत आजूबाजूला लक्ष ठेवून आहेत.
या प्रकाराची माहिती सरपंच संभाजी गाडे यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळल्याचे सांगण्यात आले. वनविभागाकडून ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, बिबट्याचा वावर कायम राहिल्यास नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
दरम्यान, केवळ सतर्कतेच्या सूचना देऊन प्रश्न सुटणार नाही. वनविभागाने परिसरात नियमित गस्त घालावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक तपासणी करून नियमानुसार तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच संभाजी गाडे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्याच्या भीतीमुळे शेतीची कामे खोळंबण्याची वेळ आली असून, वनविभागाने संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन
बिबट्याचा वावर असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामस्थांनी विशेष काळजी घ्यावी. शक्यतो एकट्याने शेतात जाणे टाळावे. शेतात जाताना सोबत काठी व टॉर्च ठेवावी. लहान मुलांना एकटे शेतात पाठवू नये. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा, पाठलाग करण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. बिबट्याच्या हालचाली आढळल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.