विद्युत तारेच्या ठिणगीने आंब्याची बाग भस्मसात pudhari photo
बीड

Mango farm fire : विद्युत तारेच्या ठिणगीने आंब्याची बाग भस्मसात

आष्टी तालुक्यातील किन्ही येथील महिला शेतकऱ्याचे लाखो

पुढारी वृत्तसेवा

आष्टी : हातातोंडाशी आलेला घास क्षणार्धात हिरावून नेणारी दुर्दैवी घटना आष्टी तालुक्यातील किन्ही येथे घडली. विद्युत तारेच्या घर्षणातून पडलेल्या ठिणगीमुळे लागलेल्या आगीत महिला शेतकरी वैशाली विनोद काकडे यांची दोन एकरांवरील सहा वर्षांची आंब्याची बाग जळून खाक झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काकडे यांची बाग यंदा भरघोस उत्पन्न देण्याच्या उंबरठ्यावर होती. ऐन आंबा तोडणीच्या हंगामातच अचानक विद्युत तार तुटून पडल्याने शॉर्टसर्किट झाले आणि ठिणगी पडून आगीने विक्राळ रूप धारण केले. काही क्षणांतच संपूर्ण बाग ज्वाळांच्या विळख्यात सापडली.या घटनेत झाडांसह आंब्याचे उत्पादन, सिंचनासाठी वापरलेले साहित्य व इतर साधनसामग्रीचे मोठे नुकसान झाले आहे. कष्टाने उभी केलेली बाग डोळ्यादेखत जळताना पाहण्याची वेळ काकडे कुटुंबावर ओढवली.

या संदर्भात डॉ. संतोष काकडे यांनी संताप व्यक्त करत, विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाले आहे. वेळेवर देखभाल व दुरुस्ती झाली असती तर ही दुर्घटना टळली असती, असा आरोप केला. दरम्यान, महावितरण उपकार्यकारी अभियंता आर. व्ही. देशमुख यांनी सांगितले की, या प्रकरणात नियमानुसार पंचनामा करण्यात येईल.

वरिष्ठांच्या स्थळ पाहणी अहवालानंतर जी काही नुकसानभरपाई देय असेल, ती संबंधित शेतकऱ्याला देण्यात येईल. घटनेनंतर ग्रामस्थांकडून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान ग्रस्त महिला शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. एका महिला शेतकऱ्याचे वर्षानुवर्षांचे कष्ट अशा प्रकारे जळून खाक होणे ही केवळ वैयक्तिक हानी नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेवरचा मोठा आघात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT