आष्टी : आष्टी शहरात सीसीटीव्ही बंद... आणि चोरटे बेधडक! अशी परिस्थिती निर्माण झाली असून गेल्या महिनाभरात महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावण्याच्या घटनांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. भरदिवसा मोटारसायकलवरून येणारे चोरटे महिलांना लक्ष्य करत ‘धूम स्टाईल’ने सोनसाखळ्या लंपास करत असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
विशेष म्हणजे, शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. बीड-नगर रोडवरील रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही केबल तुटल्या असून संपूर्ण यंत्रणा निष्क्रिय झाली आहे. मागील आठवड्यात साईबाबा मंदिर परिसर, हैदराबाद बँकेसमोर तसेच शेकापूर रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे पसार झाले होते.
त्यानंतर बीड-नगर रोडवरील ऊस संघासमोरील रस्त्यावर एका महिलेच्या दुचाकीला धडक देत तिच्या अंगावरील तब्बल पाच लाखांचे सोन्याचे गंठण लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महिला व वृद्धांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे.
दरम्यान, बीड-नगर रस्त्यावरील काम युद्धपातळीवर सुरू असून बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या केबल लवकरच दुरुस्त करण्यात येतील, असे नगराध्यक्ष जिया बेग यांनी सांगितले. शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सीसीटीव्ही पुन्हा सुरू होईपर्यंत महिलांनी भीतीतच वावरायचे का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
दरम्यान एकीकडे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतांना या टोळीला जेरबंद करण्यात पोलीसांना मात्र अपयश येत आहे. यामुळे नागरीकांमधुन संताप व्यक्त केला जात आहे.