बीड : महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायण गड येथे आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) बुधवारी रात्री पासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पंचक्रोशीतील विविध गावांमधून वारकरी, भाविक आषाढीवारी निमित्त विठूनामाचा जयघोष करत टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडीच्या माध्यमातून पायी चालून गडावर दाखल झाले आहेत.
जिल्ह्यासह विविध भागातून आषाढी एकादशी निमित्त नारायणगडावर भाविकांच्या मांदीयाळीमुळे परिसर फुलून गेला होता. यावेळी गडाचे महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज व मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते पहाटे महापूजेसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी विठुरायाच्या नामस्मरणाने व नगदनारायण महाराजांच्या जयघोषाने गडाचा परिसर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. (Ashadhi Ekadashi 2024)