नेकनूर : पुढारी वृत्तसेवा
गावातील कचरा साफ होत नसल्याने नेकनूर मधील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या खुर्च्या आणि टेबलावर कचरा आणून टाकला. संतप्त नागरिकांनी सरपंचासह ग्रामसेवकांना धारेवर धरत जाब विचारला. आता ग्रामपंचायत किती दिवसात साफसफाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मोठ्या उत्पन्नाच्या ग्रामपंचायतीमध्ये सुविधांची वाणवा कायम आहे. मूलभूत सुविधा दिल्या जात नसल्याने गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे नेकनूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्येच कचरा आणून टेबल आणि खुर्च्यांवर टाकत आपला संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ ग्रामपंचायतीमध्ये गोंधळ उडाला होता.
गावातील स्वच्छतेकडे लक्ष देऊन कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. याकडे ग्रामपंचायत लवकरात लवकर पावले उचलते का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. पाण्यासाठी अनेक भागात धावाधाव सुरू असून शिक्षक कॉलनी परिसरातील बोरवेल बंद पडल्याने शिवाय या भागात नळ योजना नसल्याने या नागरिकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. येथील नागरिकांनी टँकर देण्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली आहे.