An ocean of Banjara community members on the streets of Beed
उदय नागरगोजे
बीड, पुढारी वृत्तसेवा : बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बीडमध्ये सोमवारी विराट मोर्चा निघाला. या मोर्चाच्या माध्यमातून बंजारा समाज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले. जय सेवालालच्या घोषणांनी शहर अक्षरशः दण-ाणून गेले. यात सर्वात लक्षवेधी ठरले ते बंजारा समाजाच्या मुलींची भाषणे. व्यासपीठावरुन समाजातील एकाही नेत्याने भाषण न करता मुलींना संधी दिली आणि त्यांनी अगदी नेमक्या शब्दात समाजाच्या व्यथा सर्वांसमोर आणल्या.
बीड जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यांमध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. वाडी, वस्ती, तांड्यावर विखुरलेला हा समाज शेती आणि ऊसतोड मजुरी करणारा. काही प्रमाणात सुधारणा झालेले लोक नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात स्थलांतरित झाले असले तरी तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाचे जीवन आजही मोठ्या संघर्षाचे आहे. या बंजारा समाजाला महाराष्ट्रात एनटी प्रवर्गातील आरक्षण आहे.
तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मात्र हा समाज एसटी प्रवर्गात आहे. त्या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. परंतु २ सप्टेंबर रोजी शासनाने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला, तसा शासन आदेश देखील निर्गमीत केला. मराठा समाजासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी आता बंजारा समाजाकडून देखील याच गॅझेटच्या आधारे आम्हाला एसटी आरक्षण द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
याच मागणीसाठी सोमवारी बीडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे मोर्चाला येतांना बंजारा बांधवांना अडचणींचा सामना करावा लागला. तशाही स्थितीमध्ये हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव, महिला भगिनी मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात सहभागी युवकांनी दिलेल्या जय सेवालालच्या घोषणांनी बीड शहर अक्षरशः दणाणून गेले होते.
बंजारा समाजाच्या मोर्चावेळी व्यासपीठावर समाजातील मुलींना स्थान देण्यात आले होते. या मुलींनी पारंपारिक बोलीभाषेत तसेच मराठीतून बंजारा समाजाच्या व्यथा आणि एसटी आरक्षणाची मागणी कशी रास्त आहे हे मुद्यांसहित पटवून दिले. आरक्षणाचा द्या शिक्का, नाही तर तोंडावर मारू बुक्का आणि तरीही नाही मिळाले तर जाम करु महाराष्ट्र अख्खा असे म्हणत उपस्थितांचे लक्ष वेधले. याबरोबरच सूत्रसंचालकांनीही अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या मोर्चाचे नियोजन करत बंजारा समाजाच्या भावनांना मोकळी वाट करुन दिली.