Chennai Ads Road accident young man killed
अंबाजोगाई : शहरालगतच्या चनई-आडस रस्त्यावर उमराई फाट्याजवळ आज (दि.१२) पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने पादचारी तरुणाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला.
मृताची ओळख अंबाजोगाई येथील संत कबीर नगरमधील कुंडलिक कांबळे (वय अंदाजे ३०) अशी पटली आहे. पहाटे ते पायी जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेत डोक्यासह संपूर्ण शरीरावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळावरील भीषण दृश्य पाहून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविला.
अपघातानंतर फरार झालेल्या वाहनाचा शोध पोलिसांकडून सुरू असून, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संत कबीर नगर परिसरात शोककळा पसरली असून, बेफिकीर आणि धोकादायक वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.