Ashadhi Wari : ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने अंबाजोगाई दुमदुमली ! file photo
बीड

Ashadhi Wari : ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने अंबाजोगाई दुमदुमली !

मराठवाड्यातील एकमेव अश्वरिंगण सोहळ्याने उधळला भक्तिरंग; वारकरी, महिला आणि भाविकांच्या उपस्थितीत अविस्मरणीय सोहळा

पुढारी वृत्तसेवा

Ambajogai reverberated with the chants of "Dnyanoba-Tukaram"!

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी... कर कटावरी ठेवूनिया..." या अभंगाच्या सुरांनी आणि "ज्ञानोबा-तुकाराम... पांडुरंग हरी... विठ्ठल विठ्ठल..." या अखंड नामघोषाने बुधवारी अंबाजोगाई नगरी अक्षरशः भक्तिरंगात न्हाऊन निघाली. आषाढी वारीच्या निमित्ताने योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्टेडियम मैदानावर पार पडलेल्या मराठवाड्यातील एकमेव अश्वरिंगण सोहळ्याने हजारो भाविकांना भक्ती, परंपरा आणि वारकरी संस्कृतीचा दिव्य अनुभव दिला.

जय जय रामकृष्ण हरी... जय जय रामकृष्ण हरी... या हरिपाठाच्या गजरात टाळ-मृदुंगाच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भगव्या पताका खांद्यावर घेतलेले वारकरी, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि ओठांवर विठ्ठलनाम... असे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी अंबाजोगाईसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मैदानावर गर्दी केली होती.

बँडच्या सुरावटी, टाळ-मृदुंगाचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पालख्यांचे मैदानावर आगमन झाले. ध्वजारोहण, पालखी पूजन आणि अश्वपूजनानंतर रिंगण सोहळ्याला प्रारंभ झाला. सजविलेल्या अश्वाने मैदानावर घेतलेली वेगवान प्रदक्षिणा पाहताच उपस्थित भाविकांनी "ज्ञानोबा माऊली तुकाराम"चा एकच जयघोष केला. रिंगणातील प्रत्येक क्षण भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने भारलेला होता.

"पंढरीची वारी आहे माझे घरी..." या अभंगातील भाव प्रत्यक्ष अनुभवायला मिळावा, अशीच वातावरणनिर्मिती या सोहळ्यात झाली. वारकऱ्यांच्या कुस्त्या, महिलांच्या फेर धरून रंगलेल्या फुगड्या, पारंपरिक मैदानी खेळ आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजराने मैदान भक्तिरसाने ओथंबून गेले. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालविल्याच्या देखाव्यानेही भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

अंबाजोगाईतील नागरिकांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता, बंधुता, प्रेम आणि मानवतेचा संदेश देणारा जीवनोत्सव असल्याची अनुभूती या रिंगण सोहळ्यातून प्रत्येकाला आली.

संतश्रेष्ठ सावता महाराज भजनी मंडळ आणि संयोजन समितीने सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. भाविकांसाठी पिण्याचे पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे वारकऱ्यांच्या सेवेतून वारकरी संप्रदायाची सेवा-भक्तीची परंपरा जपली गेली.

समतेचा संदेश

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे..." म्हणत निसर्गाशी नाते जोडणारे संत तुकाराम आणि "अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग..." म्हणत समतेचा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर यांची शिकवण या रिंगण सोहळ्यातून पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. विठ्ठलनामाचा अखंड गजर, वारकऱ्यांची शिस्त, सेवाभाव आणि भक्तीमय वातावरणाने अंबाजोगाई कराना पंढरीच्या वारीचा साक्षात आनंद दिला.

मराठवाड्याचा भक्ती सोहळा

अंबाजोगाई येथे गेल्या १५ वर्षांपासून आषाढी वारीदरम्यान अश्वरिगण सोहळ्याची परंपरा अखंड सुरू आहे. मराठवाड्यातील हा एकमेव अशा प्रकारचा रिंगण सोहळा मानला जातो. त्यामुळे दरवर्षी हजारो वारकरी, महिला आणि भाविक या सोहळ्याला उपस्थित राहून विठ्ठलभक्तीचा आनंद लुटतात.

पंधरा वर्षांची अखंड परंपरा

गेल्या पंधरा वर्षांची अखंड परंपरा जपत यंदाही हा सोहळा अत्यंत भक्तिभावात पार पडला. नांदेड जिल्ह्यातील नरसी नामदेव महाराज, गंगाखेड येथील संत जनाबाई, हिंगोली जिल्ह्यातील कोंडूर येथील संत विठोबा बाबा, अमरावती जिल्ह्यातील गणोरी येथील महमंद खान महाराज तसेच अकोला येथील भाऊसागर माऊली यांच्या पालख्या अंबाजोगाईत दाखल होताच शहर भक्तिमय वातावरणात रंगून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT