अंबाजोगाई (प्रतिनिधी) : अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीच्या नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी लोकविकास महाआघाडीने जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत शहराचे वातावरण अक्षरशः ढवळून काढले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी आणि पंधरा प्रभागांतील 31 उमेदवार यांनी सोमवारी, दि. 17 रोजी मोठ्या रॅलीतून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. गेल्या नऊ वर्षांपासून नगरपरिषद निवडणूक न झाल्याने नागरिकांना लोकप्रतिनिधीच लाभला नव्हता. त्यामुळे या निवडणुकीकडे शहरभरातून अभूतपूर्व उत्सुकता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हा शेवटचा दिवस होता. याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि समविचारी पक्षांनी एकत्र येऊन तयार झालेल्या लोकविकास महाआघाडीचे सर्व उमेदवार शहरभर काढलेल्या महारॅलीत सहभागी झाले. शहरातील प्रत्येक रस्त्यावर फटाके, ढोल, बॅण्ड, घोषणा आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. रॅलीचा जो उत्साह होता, तो गेले अनेक वर्ष शहराने पाहिला नव्हता.
रॅलीची सुरुवात गुरुवार पेठेतील जोधाप्रसादजी मोदी विद्यालयापासून झाली. त्यानंतर रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, सदर बाजार, मोची गल्ली, गांधी नगर, मंडी बाजार, पाटील चौक, मंगळवार पेठ, वीर सावरकर चौक या मुख्य मार्गांनी पुढे जात नगरपरिषद कार्यालय गाठले. या प्रवासात हजारोंचा जनसमुदाय उमेदवारांसोबत चालत होता. महिलांची, तरुणांची आणि जेष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती पाहून महाआघाडीच्या नेत्यांचा उत्साह दुणावला.
या रॅलीत राजकिशोर मोदी, नानासाहेब गाठाळ, माजी आमदार पृथ्वीराज साठे, बबनराव लोमटे, डॉ. नरेंद्र काळे, महेंद्र निकाळजे, दीपक कांबळे, हाजी महमूद, खालेद चाऊस आणि महाआघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांचा वर्षाव, जल्लोष आणि घोषणांनी रॅलीचे स्वागत केले. शहरातील जनता ज्या प्रकारे रॅलीसोबत उत्स्फूर्तपणे सहभागी झाली, ते पाहून महाआघाडीच्या कार्यकर्त्यांचे डोळे आनंदाने भरून आले.
या शक्तिप्रदर्शनामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. अनेक ठिकाणी नागरिकांचा असा विश्वास ऐकायला मिळाला की यंदा अंबाजोगाईत सत्ता परिवर्तन ठरल्यासारखे आहे. “न भूतो न भविष्यति” असा जनतेचा प्रतिसाद महाआघाडीच्या उमेदवारांना मिळत असल्याने त्यांना विजयाबद्दल मोठा आत्मविश्वास वाटत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राजकिशोर मोदी यांनी नागरिकांचे आभार मानत सांगितले की, अंबाजोगाईचे विकासचित्र पूर्णपणे बदलण्यासाठी महाआघाडी तयार आहे. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक, उद्याने आणि सार्वजनिक सुविधा यामध्ये आधुनिक बदल करण्याची योजना ते लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, “आजच्या रॅलीत सहभागी झालेली प्रत्येक व्यक्ती अंबाजोगाई शहरातीलच आहे. ग्रामीण भागातील कोणीही नव्हते. हेच दाखवते की नगरपरिषद निवडणुकीत मतदारांचा विश्वास महाआघाडीवर आहे.”
आज झालेल्या भव्य शक्तिप्रदर्शनातून आगामी निकालाची झलक दिसून आल्याचे अनेक नागरिकांमध्ये बोलले जात आहे. शहरात निर्माण झालेल्या प्रचंड उत्साहाने लोकविकास महाआघाडीचा विजयी नाद अधिकच बुलंद झाला आहे.