Ambajogai cheque bounce case
अंबाजोगाई : ऊस पुरवठा करारातील थकबाकी रकमेच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याच्या प्रकरणात चौडी (ता. धारूर) येथील दत्ता पंढरी अडगळे याला अंबाजोगाई येथील दिवाणी न्यायाधीश (क.) व मुख्य न्यायिक दंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयाने ९ लाख २० हजार ५०० रुपयांचा दंड आणि तीन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांचा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेश दिले आहेत.
२०११-१२ मध्ये दत्ता अडगळे यांनी आंबाजोगाई सहकारी साखर कारखान्यासोबत ऊस पुरवठ्याचा करार केला होता. करारानुसार ६ लाखांची उचल मिळाली, मात्र करार पूर्ण न झाल्याने २.५ लाख रुपये परत करण्यात आले. उर्वरित ३.५ लाख मुद्दल व १,१०,२५० रुपये व्याज अशी एकूण ४,६०,२५० रुपयांची थकबाकी राहिली.
थकबाकीच्या परतफेडीसाठी १० डिसेंबर २०१३ रोजी कारखान्याच्या नावे दिलेला धनादेश बँकेत सादर करताच खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो वटला नाही. कारखान्याने वारंवार नोटीस पाठवूनही अडगळे यांनी प्रतिसाद दिला नाही.
कारखान्याने न्यायालयात फिर्याद दाखल केली. साक्षी, कागदपत्रे आणि विधिज्ञांच्या युक्तिवादावर विश्वास ठेवून न्यायालयाने अडगळे यांना दोषी ठरवले. या प्रकरणात फिर्यादी कारखान्याच्या वतीने अॅड. प्रवीण मेटे यांनी काम पाहिले, तर लालासाहेब इंगळे व गोवर्धन पवार यांनी साक्ष दिली.