Ajit Pawar Beed Railway :
राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जिल्हा रूग्णालयातील कॅथलॅबचे उद्घाटन केलं. या उद्घाटन प्रसंगी देखील अजित पवार यांनी आपला स्पष्टवक्तेपणा जपला आणि कंत्राटदारांवर चांगलंच फैलावर घेतलं. त्यानंतर अजित पवार यांनी बीडमध्ये येऊ घातलेल्या रल्वेवरून देखील राजकीय फटकेबाजी केली. त्यांनी बीडच्या रेल्वेवरून माजी खासदारांना टोला लगावला.
अजित पवार यांनी आज बीड जिल्हा रूग्णालयातील कॅथलॅबचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी कामाच्या गुणवत्तेवरून कंत्राटदारांची चांगलीच शाळा घेतली. त्यांनी उद्घाटन केलं मात्र कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. अजित पवार यांनी कॅथलॅबच्या दरवाजा फिटिंग, रंगकाम, लाईट यावरून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना अनेक सुचना केल्या. यानंतर त्यांनी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या देखील इशारा दिला.
दरम्यान, अजित पवार यांनी बीडमधील रेल्वे आणण्याच्या मुद्यावरून माजी खासदारांना चांगलाच चिमटा काढला. ते म्हणाले, कितीतरी निवडणुका आल्या आणि गेल्या कितीतरी खासदारांनी आश्वासनं दिली. मात्र बीडमध्ये रेल्वे काही आली नाही.
अजित पवार पुढे म्हणाले, 'आम्ही मात्र ठरवलं होतं की रेल्वे आणायचीच. पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी घेतल्यापासून ठरवलं होतं, आमच्या सरकारच्या माध्यामातून रेल्वे कामाला गती दिली. आता हे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे.' दरम्यान, सरकारनं अहिल्यानगर ते बीड अशी रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर-बीड-परळी या रेल्वेमार्गासाठी अर्थ खात्यानं १५० कोटींची तरतूद केल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं आहे.