केज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक मद्यपी शिक्षक दहा दिवस झाले शाळेत आले नाहीत. File Photo
बीड

दहा दिवस झाले तरी मद्यपी गुरुजी शाळेला आलेच नाहीत!

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक शिक्षक तीन दिवस विना परवाना गैरहजर राहिला होते. त्यानंतर तो चौथ्या दिवशी दारू पिऊन शाळेत आले होते. ही माहिती गावकऱ्यांना होताच ते पळून गेले. आता दहा दिवस उलटले तरी त्यांनी शाळेचे तोंडच बघितले नसल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेबाबत गट शिक्षण अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव केंद्रातील शेलगाव गांजी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर प्रतिनियुक्तीवर असलेले शिक्षक व्यंकट मुंडे हे दि. ४ ऑक्टोबर पासून तीन दिवस गैरहजर होते. त्यानंतर दि.७ ऑक्टोबर रोजी ते सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास उशिरा शाळेत आले. मात्र 'गुरुजी ' मद्यपान करून आल्याने ते नशेच्या अंमलाखाली असल्याचा संशय मुख्याध्यापिका सिंधू मुंडे आणि विद्यार्थ्यांना आला. खबरदारी म्हणून मुख्याध्यापिका सिंधू मुंडे यांनी सदर मद्यपी सहशिक्षक मुंडे यांना वर्गावर जाण्या पासून रोखले आणि या सर्व प्रकारची कल्पना त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान बचुटे यांना फोनवरून दिली.

तसेच याची माहिती गावकऱ्यांनाही झाली. गावकऱ्यांनी या बाबतची तक्रार गटशिक्षणाधिकारी यांच्यासह पोलिसांकडे केली. हा सर्व प्रकार मद्यपी गुरुजी व्यंकट मुंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी गावातून पोबारा केला. त्या नंतर दि. ७ ऑक्टोबर पासून ते शिक्षक शाळेत आलेले नाहीत. तसेच त्यांनी याबाबत शिक्षण विभागाला लेखी किंवा तोंडी काही माहिती कळविली नसून ते बेकायदेशीरपणे गैरहजर आहेत.या प्रकरणी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी दखल घेत जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

" गटशिक्षण अधिकारी कार्यालयाने जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त होताच सदर शिक्षकावर जिल्हा परिषद सेवा शर्ती आणि शिस्तपालन अधिनियमा नुसार त्यांची चौकशी करून निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाईल. "
-लक्ष्मण बेडसकर (गट शिक्षण शिक्षणाधीकारी, केज )
" मद्यपी शिक्षकामुळे शाळा आणि गावाची नाचक्की होत आहे तसेच काही अनुचित प्रकार घडल्यास याला शिक्षण विभाग सर्वस्वी जबाबदार राहील त्यामुळे या शिक्षकांवर कठोर कारवाई व्हायला हवी."
-समाधान बचुटे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT