परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा
औरंगजेबा संदर्भात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अल्पवयीन दोघांविरुद्ध कारवाई परळी शहर पोलीसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
दोन समाजात द्वेष भावना वाढवण्याच्या उद्देशाने 2 अल्पवयीन इसमांनी इंस्टाग्रामवर दि. 22/3/2025 रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान औरंगजेबा संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. सायबर पोलीस सोशल मीडियावर लक्ष ठेवून असल्याने ही पोस्ट दिसून आली.
तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ही पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले. सायबर पोलीसांकडील उपलब्ध व्हायरल पोस्टवरून पोलीस ठाणे परळी शहर येथे गोपनीय शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल विष्णू फड यांच्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही पोस्ट समाज मध्यमावरून हटविण्यात आली आहे. समाज माध्यमावर चुकीच्या पोस्ट व्हायरल करताना, सामाजिक भावना लक्षात घेऊन संवेदनशील रहावे, विनाकारण पोस्ट व्हायरल करू नये, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यां विरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल तसेच आपापल्या अल्पवयीन मुलांच्या मोबाईलवर पालकांनी लक्ष ठेवावे असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
समाजमाध्यमांवर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पोस्ट कोणीही करु नये. अल्पवयीन मुलांचा अशा आक्षेपार्ह पोस्ट करण्यात अधिक प्रमाणात सहभाग निदर्शनास येत आहे. पालकांनी पाल्यासोबत संवाद साधत या विषयीचे गांभीर्य लक्षात आणून द्यावे. सायबर सेल संपूर्ण अशा घटनांकडे लक्ष ठेवून आहे. संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी याची दक्षता घ्यावी.
रघुनाथ नाचण, पोलीस निरीक्षक, परळी शहर पोलीस ठाणे