Accident News: Tragic End for a Young Man Dreaming of Marriage
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : लग्न अवघे अठरा दिवसांवर आले होते. घरात लगीनघाई सुरू होती. प्रत्येक जण आनंदात होते. लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. विवाहाची स्वप्न रंगवणाऱ्या तरुणाचा नियतीने बेरंग केला.
एका क्षणात कोल्हे कुटंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. परतूर आष्टी मार्गावरील दैठणा बु. गावाजवळ हायवा आणि दुचाकीच्या अपघातात कोल्हे कुटुंबातील तरुणाचा सोमवार, दि. १ रोजी करुण अंत झाला. बोहल्यावर चढवण्यापूर्वीच त्याला तिरडीवर उचलण्याची वेळ आल्याची भावना आप्तगणातून व्यक्त होत होती. या हृदयद्रावक घटनेमुळे उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
दरम्यान, गोळेगाव येथील तरुण राम आसाराम कोल्हे २४ हा परतूर येथील कामे आटोपून शेगाव पंढरपूर दिंडी मागनि आपली दुचाकी क्रमांक एम एच२१, सि के ८००२ ने आष्टीकडे येत होता. याच वेळी आष्टीकडून कच घेऊन जाणारा एम एच २१, सी सी १००३ क्रमांकाच्या हायवाने राम कोल्हे यांच्या दुचाकीला दैठणा बु. पाटीजवळ जोरदार धडक दिली. या राम कोल्हे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातातील हायवा ताब्यात घेतला असून, चालक मात्र फरार झाला आहे. पोलिसांनी शव परतूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. येथे आरोग्य अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन केले. त्याच्या पश्चात आजी आजोबा, आई वडील, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.
१९ जून रोजी होणार होता विवाह
अपघातात मृत्यू झालेल्या राम कोल्हे यांचा विवाह १९ जून रोजी नियोजित होता. त्यासाठी कोल्हे कुटुंबाने जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र त्या अगोदरच काळाने घाला घातल्याने गोळेगावासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे-