67 people died in road accidents in Umarga taluka in a year
शंकर बिराजदार
उमरगा : तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गासह विविध राज्य आणि जिल्हा मार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघात घडतात. यामध्ये दुचाकींचे प्रमाण मोठे आहे. गेल्या वर्षभरात तालुक्यातील विविध मार्गावर झालेल्या वाहन अपघातात ६७जणांना 'यमसदना'चे दर्शन घ्यावे लागले.
यात १४ गंभीर तर १० जण किरकोळ जखमी झाले. उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व इतर मार्गावर एप्रिल २०२४ ते मे २०२५ या १४ महिन्यांत एकूण ६२ अपघात घडले आहेत. त्यात ६७ जणांचा मृत्यू, १४ जण गंभीर जखमी तर १० जण किरकोळ जखमी झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.
गतवर्षी या सर्व मार्गांवर एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ एक वर्षात ४५ अपघातात ५१ जणांचा मृत्यू तर १५ जखमी झाले आहेत. गतवर्षपिक्षा अपघाताची संख्या वाढत चालली आहे. दररोज तालुक्यात कुठे ना कुठे अपघातांची मालीका सुरूच आहे. वर्षभरात घडलेल्या विविध अपघातांच्या कारणांचा शोध घेतला तर बहुतांश ठिकाणी तीच ती कारणे आहेत.
त्यात रस्त्यांची सदोष रचना, सुसाट वेगाने वाहन चालविणे, निष्काळजीपणे ओव्हरटेक, वाहतूक नियमांचे उल्लंघन, विना परवाना वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाढती वाहने, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे ही अपघातांची महत्त्वाची कारणे आहेत.
अपघाताचे वाढते प्रमाण व त्याची नेमकी कारणे, या विषयावर चर्चा केल्या जातात. अपघात झाला की प्रत्येक जण रस्त्याला दोष देऊन मोकळे होतात. बहुतांश अपघातांमागे मात्र वाहनचालक, परिवहन अधिकारी, पोलिस यांच्यासह संबंधित घटकांची बेफिकीर वृत्तीही तितकीच जबाबदार आहे. अपघातात मरण पावणारी जास्तीत जास्त माणसे कमावत्या वयोगटातील आहेत. त्या दृष्टीने संबंधित कुटुंबाचे यामध्ये नुकसान आहे. त्यामुळे प्रत्येक घटकाने ही बाब गांर्भीयाने घेण्याची गरज आहे.
अपघात रोखण्यासाठी सुरक्षा सप्ताह राबविला जातो. प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक शाखा, महामार्ग पोलिस उपाययोजना करते. परंतु, या उपाययोजना थिट्या पडतात. वाहतूक नियमांची प्रत्येकाला माहिती देण्यासाठी सामाजिक संस्थांनी शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून जनजागृती करण्याची गरज आहे. शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत जागरूक करणे गरजेचे आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणार नाही, अशी शपथ पालकांनी घेण्याची गरज आहे.
उमरगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ महिन्यांतील अपघातात दुचाकी १७, कार १२, तीन, चार चाकी व जड ३१ वाहनांचा समावेश आहे. यात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. सोलापूर हैदराबाद डेराष्ट्रीय महामार्ग अपघात ६५, मृत्यू २४, जखमी ०६., लातूर कलबुर्गी राज्यमार्ग : अपघात २४, मृत्यू २७, जखमी ०७., इतर मार्ग अपघात १४ मृत्यू १७ जखमी ०७