40 to 50 percent drop in livestock prices
गौतम बचुटे
केज, पुढारी वृत्तसेवाः ज्या जनावरांच्या साथीने काळ्या आईच्या कुशीत घाम गाळला, शेतात राबून संसार उभा केला, त्याच मुक्या जिवांना आज दुष्काळाच्या झळांमुळे विक्रीसाठी बाजारात आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांचा सौदा करताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावतात, कंठ दाटून येतो; मात्र चारा-पाण्याअभावी त्यांना हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे.
बीड जिल्हह्यगतील केज तालुक्यातील साळेगाव येथील गुरांच्या आठवडी बाजारात गुरुवारी दुष्काळाचे हे विदारक चित्र पाहायला मिळाले, पशुधनाची आवक वाढली असताना खरेदीदारांची संख्या मात्र तुलनेने कमी असल्याने जनावरांचे भाव ४० ते ५० टक्क्यांनी घसरल्याचे शेतकरी सांगतात. दुष्काळाने शेतीचे उत्पन्न हिरावले आणि आता जगण्याचा आधार असलेले पशुधनही हिरावून नेण्याची वेळ आणली आहे.
यंदाच्या पावसाच्या कमतरतेमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न नसताना पशुधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे नवे संकट उभे राहिले आहे. साठवण तलावांमधील पाणीसाठा कमी होत असून विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळीही खोल गेली आहे.
परिणामी, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
गंभीर होत असताना जनावरांना पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न पशुपालकांना सतावत आहे. शेतात चारा उपलब्ध नाही, बाजारातून चारा विकत घेण्याची आर्थिक क्षमता नाही आणि जनावरांना जगविण्यासाठी आवश्यक पाणीही मिळत नाही. अशा कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना अखेर आपल्या पशुधनाला बाजाराचा रस्ता दाखवावा लागत आहे.
साळेगावच्या बाजारात देशी व गावरान बैल, गायी, जर्सी गायी, म्हशींसह विविध जातींच्या जनावरांची मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आवक झाली. बीड जिल्ह्यासह धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील पशुपालक व व्यापारी या बाजारात येतात. मराठवाड्यातील मोठ्या गुरांच्या बाजारांपैकी एक असलेल्या या बाजारात दर आठवड्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र, यंदा दुष्काळामुळे बाजारातील व्यवहारांचे चित्र बदलले आहे.
साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होत असताना ऊसतोड मजुरांचे स्थलांतर आणि बैलजोड्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार या बाजारात मोठ्या प्रमाणात होत असतात. मात्र, यंदा ऊसतोड मजूर कारखान्यांकडे रवाना होत असतानाही बाजारात मोठ्या संख्येने जनावरे विक्रीसाठी येत असल्याचे चित्र आहे.
पशुधन विकणाऱ्यांची संख्या वाढली असताना खरेदीसाठी येणारे पशुपालक तुलनेने कमी असल्याने जनावरांचे दर कोसळले आहेत. शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे जपलेल्या बैलजोड्या आणि गायी-म्हशी विक्रीसाठी आणल्या आहेत. जनावरांना चारा-पाणी देणे शक्य नसल्याने कमी भावातही त्यांची विक्री करण्याची वेळ आली आहे. काही शेतकऱ्यांसमोर तर जनावरे कसायाच्या दावणीला बांधली जाण्याची भीती उभी राहिली आहे. त्यामुळे आर्थिक अडचण कितीही मोठी असली, तरी आपले जनावर कसायाला विकायचे नाही, अशी भावनिक भूमिका अनेक शेतकरी घेत आहेत.
शेती गेली, उत्पन्न गेले; आता पशुधनही विकण्याची वेळ आली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असलेले पशुधन मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी आणि मुक्या जनावरांचे जीव वावविण्यासाठी दावणीला चारा-पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.
छावणीमध्ये जनावरांना संसर्गजन्य आजारांचा धोका
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधन वाचविण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे. चारा छावण्यांमध्ये जनावरांना एकत्र ठेवल्याने लाळ्या खुरकूत, लंपी, फऱ्या आणि घटसर्प यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता पशुपालक व्यक्त करतात. त्यामुळे छावण्यांवर अवलंबून राहण्याऐवजी दावणीवरच जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी थेट मदत किंवा आवश्यक अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
कसायाला जनावरे देणार नाही!'
दुष्काळामुळे जनावरांचे भाव ४० ते ५० टक्क्यांनी घसरले आहेत. जनावरांना खाऊ घालण्यासाठी चारा नाही आणि पिण्यासाठी पाणी नाही, त्यामुळे नाइलाजाने विक्रीसाठी बाजारात यावे लागत आहे. जनावरे विक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू येतात, तर सौदा करताना कंठ दाटून येतो. मात्र, कितीही कमी भाव मिळाला तरी जनावर कसायाला विकायचे नाही, अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. या मुक्या जनावरांशी शेतकऱ्यांचे आर्थिक नाते नसून अनेक वर्षांच्या कष्टांचे आणि जिव्हाळ्याचे बंध जोडलेले आहेत असे सरपंच कैलास पाटील यांनी सांगितले.