माजलगाव : डीपी बसविण्याचे काम सुरू असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून एका ३२ वर्षीय कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला. आवेज पाशा देशमुख (रा. केसापुरी, माजलगाव) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि.९) एकच्या सुमारास माजलगाव शहरातील बायपास रोडवर घडली. याप्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता, संबंधित लाईनमन, कामाचे कॉन्ट्रॅक्टर आणि सुपरवायझर अशा चार जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बायपास रोडवर असलेल्या चाऊस यांच्या तबेल्यासमोर नवीन डीपी बसविण्याचे काम कॉन्ट्रॅक्टर धैर्यशील भागवत ठोंबरे यांना देण्यात आले होते. रविवारी चार मजूर हे काम करत होते. नियमानुसार डीपी बसविण्याच्या या कामासाठी महावितरणकडून दुपारी चार वाजेपर्यंतचे 'शटडाऊन' किंवा परमिट घेण्यात आल्याचे सुपरवायझरने मजुरांना सांगितले होते. परंतु, ठरवलेल्या वेळेच्या आधीच काम चालू असतानाच दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक वीजप्रवाह सुरू झाला. यामुळे खांबावर किंवा डीपीजवळ काम करत असलेले शेख आवेज पाशा देशमुख यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि ते खाली कोसळले.
या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. उपस्थित सहकाऱ्यांनी आणि नागरिकांनी आवेज पाशा देशमुख यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात हलवले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महावितरणचे सहायक अभियंता, संबंधित भागातील लाईनमन, कॉन्ट्रॅक्टर धैर्यशील भागवत ठोंबरे, सुपरवायझर दयानंद नामदेव कांबळे या सर्वांचा समावेश असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
मृत आवेज देशमुख यांच्या पश्चात पत्नी, तीन लहान अपत्ये, आई आणि दोन भाऊ असा परिवार आहे. कुटुंबातील एकमेव कर्त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे केसापुरी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. तसेच महावितरण व कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.