पिंपळनेर; रामेश्वर जाधव : बीड तालुक्यातील सिंदफना नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर तहसीलदार सुहास हजारे यांच्यासह मंडळ अधिकारी यांच्या पथकांनी कारवाई केली. वाळू माफियांनी साठवून ठेवलेले वाळूचे साठे जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
सिंदफना नदी पात्रातून भाटसांगवी, कुक्कडगाव, खुंर्डस, रामराव नाथापुर, रजेंगाव या गावांच्या हद्दीत प्रवेश गावच्या काटावर असणाऱ्या सिंदफना नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू होता. हा वाळू उपसा बंद करून वाळू माफियांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. याबाबत 9 मे रोजी 'दैनिक पुढारी'ने बातमी प्रकाशित केली होती. याची दखल घेत बीड जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी सिंदफना नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार सुहास हजारे यांच्यासह मंडळ अधिकारी यांच्या पथकांनी वाळू माफियांनी साठवून ठेवलेले साठे जप्त केले व वाळू पसरवून नष्ट केली. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. सिंदफना नदी पात्रात केलेल्या या कारवाईमुळे पिंपळनेर परीसरातील शेतकऱ्यांकडून आभार मानले जात आहे.
कारवाईदरम्यान पथकाने रंजेगाव लगतच्या सिंदफणा नदीपात्रातील अनधिकृत वाळूसाठ्यातील अंदाजे 40 ब्रास वाळू जेसीबीच्या साहाय्याने नदी पात्रात ढकलून नष्ट केली. नदीपात्रा मध्ये वाळू पाण्याने धुण्यासाठी वापरत असलेले दोन डिझेल इंजिन जप्त केले. कुक्कडगाव येथील सिंदफना नदीपात्रातील 30 ब्रास वाळू साठा व मौजे आडगाव येथील सिंदफना नदीपात्रातील 20 ब्रास वाळू देखील जेसीबीच्या साहाय्याने नदी पात्रात ढकलून नष्ट करण्यात आली. तहसिलदार सुहास हजारे, नायब तहसिलदार महादेव चौरे, पोलीस उपनिरीक्षक कैलास भारती, मंडळ अधिकारी सचिन सानप, जितेंद्र वाघ, पंडित नाईकवाडे, हरिदास काकडे, तलाठी उमेश खिंडरे हे हजर होते.
हेही वाचा :