मराठवाडा

बीड : केज तालुक्याला गारपिटीचा फटका; अठरा तासानंतरही शेतात गारांचा खच

मोहन कारंडे

केज; गौतम बचुटे : केज तालुक्यात शनिवारी झालेल्या गारपिटीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तब्बल अठरा तासानंतरही शेतात गारांचा खच पडला आहे. अवकाळीने तालुक्यातील डोका (हादगाव) येथे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आंबा, चिंच यासह फळभाज्या, ज्वारी व गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. गारपिटीत मांगवडगाव, देवगाव आणि हंगेवाडी येथे विज कोसळून पाच जनावरांचा मृत्यू झाला.

शनिवारी झालेल्या अवकाळी गारपिटीने केज तालुक्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. हादगाव, डोका, शिरूर, नांदूरघाट, उत्तरेश्वर पिंप्री, शिरूरघाट, राजेगाव, नाव्होली, मांगवडगाव, साळेगाव, माळेगाव, युसुफवडगाव, धनेगाव, कोरेगाव, कोठी, मस्साजोग, चिंचोली माळी, सुर्डी (सोनेसंगवी), लाखा, सोनेसांगवी, विडा या ठिकाणी वादळवारा आणि विजेच्या गडगडटासह गारपीट झाली. गारपिटीने आंबा, चिंच, फळभाज्या, पालेभाज्या, टरबूज, झेंडू, मिरची यासह ज्वारी आणि गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडलेला आहे. दरम्यान आज सकाळपर्यंत गारा विरघळल्या नव्हत्या. डोका (हादगाव) येथे झालेल्या गारपीटीमुळे अठरा तासानंतरही शेतात गारांचा खच पडलेला होता.

आ. नमिता मुंदडा यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी

केज तालुक्यात झालेल्या गारपिटीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तहसीलदार डी. सी. मेंडके, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे आणि तालुका कृषी अधिकारी वाघमारे हे नुकसानीची पहाणी करणार आहेत.

SCROLL FOR NEXT