धारूर, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील आडस येथे एका घरात स्वयंपाक करताना अचानक पेट घेतल्याने मोठा स्फोट झाला. गुरुवारी (दि. २) सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेत मुलगी जागीच ठार तर आई गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला अंबाजोगाई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
कमल आश्रुबा इंगळे ((वय ३५, रा. आडस, ता. केज) असे मयत महिलेचे नाव, तर जखमी महिलेचे लोचनाबाई आश्रुबा इंगळे (वय 70) असे नाव आहे. नात्याने मुलगी व आई आहेत. मयत महिलेचा भाऊ दिनेश इंगळे हा अपंग असून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पान टपरी चालवतो व तेथेच पेट्रोल विक्रीसाठी ठेवतो. आज गुरुवारी ( दि. २ ) सायंकाळी ७ च्या सुमारास घरात मुलगी व आई दोघे मिळून स्वयंपाक करताना अचानक घराने पेट घेतला. पेटते घर पाहून मायलेकींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक स्फोट झाला. आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे कमल इंगळे या जळून जागीच ठार झाल्या तर आई भाजल्याने गंभीर जखमी झाली. हा स्फोट पेट्रोलचा झाल्याचा अंदाज आहे. पोलीस व धारुर अग्निशामक दल दाखल झाले आहे. या घटनेने आडस व परिसरात एकच खळबळ माजली आहे.