हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत येथील बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी व इतर दोन विभागांच्या अंगणवाडी मदतनीसांच्या १९ जागेसाठी तब्बल २८९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे मदतनीसांठी किमान पात्रता बारावीची असताना या पदासाठी बी.ए., एम.ए., बी.एड, डी.एड, इंजीनियरिंग यासारख्या उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ग्रामीण व शहरी भागात सुरू असलेल्या अंगणवाडी केंद्रामध्ये सध्या मदतनीस भरती प्रक्रिया सुरू आहे. हिंगोलीत नागरी विभागासाठी १२ जागा आहेत. त्यासाठी १९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कळमनुरी विभागासाठी पाच जागा असून त्यासाठी ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर वसमत प्रकल्प कार्यालयासाठी २ जागा असून त्यासाठी तब्बल ३८ अर्ज प्राप्त झाले आहेत. मदतनीस पदासाठी बी.ए., एम.ए., बी.एड., डी.एड., इंजीनियरिंग अशा उच्च विद्याविभूषित उमेदवार मदतनीस म्हणून अंगणवाडी केंद्रात काम करण्यास तयार आहेत. त्यांना शासनाकडून दरमहा साडेपाच हजार रुपये एवढे मानधन दिले जाते. गावस्तरावर शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने अंगणवाडीच्या माध्यमातून लहान मुलांना शिकविणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, लसीकरण अशा प्रकारच्या जबाबदार्या पार पाडाव्या लागतात. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी यापूर्वी किमान दहावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता होती. त्यामध्ये शासनाने बदल केला असून आता शैक्षणिक पात्रता ही किमान १२ आहे.
रिक्त असलेल्या मदतनीस पदाकरिता वरिष्ठ पातळीवर प्राप्त सुचनेनुसार पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात उच्चशिक्षीत उमेदवारांनी देखील अर्ज केले आहेत. उच्चशिक्षीत उमेदवार मदतनीस पदासाठी इच्छुक असल्याने निश्चितच पुर्वप्राथमिक शिक्षणासाठी त्याचा फायदा होईल, असे मत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी व्यक्त केले आहे.