मराठवाडा

परभणी : युरिया खताचा कृत्रिम तुटवडा; कृषी विभागाचे दुर्लक्ष

Shambhuraj Pachindre

सेलू; पुढारी वृत्तसेवा : सध्या खरीप हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झाली आहे.परंतु, पिकांना खते देण्याच्या कालावधीमध्ये दुकानदारांकडून युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. या गंभीर बाबीकडे कृषी विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना कुणी वाली राहिलेला दिसत नाही. याप्रकरणी तातडीने कारवाईची मागणी दबाव गटाच्या वतीने तहसीलदार यांना आज (दि.३) निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, कृषी विभागातर्फे खत, औषधे विक्रीवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. असे असतांना ऐन मोसमात युरिया खतांचा दुकानदार जाणीवपूर्वक कृत्रिम तुटवडा निर्माण करीत आहेत. तसेच युरिया हवा असेल तर शेतकऱ्यांना आवश्यक नसलेली औषधे विकत घेण्याची सक्ती केली जात आहे.

अनावश्यक औषधे घेतली तरच युरिया खत मिळत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. तसेच युरिया खताची चढ्या दराने देखील विक्री होत आहे. युरिया खताची लिंकिंग न होता शेतकऱ्यांना रास्त भावाने आणि आवश्यक प्रमाणात युरिया खत देण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

यासाठी दबाव गटाचे निमंत्रक अॅड.श्रीकांत वाईकर,ओमप्रकाश चव्हाळ, लिंबाजी कलाल, गुलाबराव पौळ, नारायण पवार, इसाक पटेल, दिलीप शेवाळे, राजेंद्र केवारे, सतीश काकडे, विलास रोडगे, उत्तम गवारे, रामचंद्र कांबळे, लक्ष्मण प्रधान, दत्तराव कांगणे, रामचंद्र आघाव, उमेश काष्टे, योगेश सूर्यवंशी, मतीन दादामिया, अजित मंडलिक, रौफ भाई, मुकुंद टेकाळे, परमेश्वर कादे, दिलीप मगर, विठ्ठल काळे, अॅड.देवराव दळवे आदींनी पुढाकार घेतला होता.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT