मराठवाडा

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री-गृहमंत्री अंतरवलीच्या महिलांची माफी मागा; ‘या’ गावातील मराठा समाजाचे जलसमाधी आंदोलन

backup backup

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलकांवर सराटे अंतरवलीत झालेल्या बेछुट लाठीमाराचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. आज (दि. ३) गेवराई तालुक्यातील गोदाकाठी गुळज पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या सर्व गावच्या नागरीकांनी जलसमाधी आंदोलन करत गोदापात्रात उड्या घेतल्या. या वेळी 200 पोलिसांच्या फौजफाट्यासह दंगल नियंत्रण पथक आणि एनडीआरएएफचे पथक घटनास्थळी तळ ठोकून होते. आंदोलकांनी आक्रमक होत सरकार विरोधात घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सराटे अंतरवलीत येऊन महिलांची माफी मागावी अशी प्रमुख मागणी लावून धरली तर दुसरीकडे निपाणी जवळका येथे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून अंत्यविधी केला. या आंदोलनातून सरकारविरोधात सर्वसामान्य मराठा समाजात किती संताप आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

याबाबत अधिक असे की, जालना जिल्ह्यातील सराटे अंतरवली येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन चिरडण्या हेतू परवा आंदोलकांवर बेछुट लाठीहल्ला करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या या लाठीमारात अनेक महिला, वृद्ध जखमी झाले. त्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत असून अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. आज गेवराई तालुक्यात दोन ठिकाणी सरकारविरोधात संतप्त मराठ्यांनी टोकाचे आंदोलन केले.

गुळज पंचायत समिती गणाअंतर्गत येणार्‍या गुळज पाथरवाला, गुंठेगाव, बोरगाव, सुरडेगाव, मालेगाव (खु.), मालेगाव (बु.), राक्षसभुवन, पांचाळेश्वर, उमापूर, टाकळी, उंचेगाव, हिरडापूरी, सास्तेपिंपळगाव येथील हजारोंच्या संख्येने मराठा समाज गोदागाठावर एकत्र आले आणि त्यांनी थेट गोदावरी पात्रात उड्या घेत जलसमाधी आंदोलन केले. गोदापात्रातील पाण्यात उतरून सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. या वेळी घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिक्षकांसह दोनशे पोलीस, दंगल नियंत्रण पथक, एनडीआर पथक उपस्थित होते.

आंदोलकांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे या प्रमुख मागणीसह सराटे अंतरवली येथे पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्या महिलांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी गावात येऊन माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. दुसरीकडे निपाणीजवळका येथे सरकारच्या निषेधार्थ समाजबांधव एकत्रित आले. सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली, तिरडी बांधण्यात आली, समोर मडके धरण्यात आली आणि ही अंत्ययात्रा थेट स्मशानात गेली. आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे संतप्त पडसाद आजही राज्यभरात उमटताना दिसून येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT