गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यातील अगरवाडगाव धनगर पट्टी शिवारात शनिवारी (दि. १०) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शिकार केलेल्या बक-याचा फडशा पाडला. या घटनेचा व्हिडिओ एका शेतकऱ्यांने बनविला आहे. बिबट्या दिसल्याने पुन्हा परिसरातील शेतकऱ्यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
गंगापूर तालुक्यातील धनगर पट्टी भागात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतीच्या दैनंदिन कामांसाठी मजूर येण्यास तयार नाहीत. तर जिवाच्या भीतीने दहशतीखाली असलेले शेतकरी शेताकडे फारसे जात नसल्याचे काही ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान दिलिप प्रकाश सुखधान गट नंबर २१४ यांच्या शेतातील शेडजवळ दिनांक ९ जून रोजी बिबट्याने एका बकरीची शिकार केली होती. केलेली शिकार खाण्यासाठी १० जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या शेडजवळ येवून दबा धरुन बसला होता. ही बाब परिसरातील सात ते आठ शेतकऱ्यांनी निदर्शनास आली. यानंतर सर्व शेतकरी घाबरले. तर एक शेतकरी उध्दव सुखधान यांनी प्रसंगावधान राखत दरवाज्याच्या एका फटीतून बिबट्याचा व्हिडिओ शूट केला. यात बिबट्या बकरीवर ताव मारताना व मोबाईलकडे पाहताना कैद झाला.
बिबट्याच्या भितीने शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी किंवा मशागत करण्यासाठी जात येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, वनविभागाकडे बिबट्याचा वावर असलेल्या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा :