केज (बीड); पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील कोरेगाव येथील मिलिंद शिनगारे याच्या मृत्यू प्रकरणी मस्साजोग येथील एका हॉटेल मालक आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल दीड महिन्यानंतर ॲट्रॉसिटीसह मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २५ मार्च रोजी कोरेगाव (ता. केज) येथील मिलिंद शिनगारे आणि त्याचा मित्र रमेश घुले हे मस्साजोग येथील शिवनेरी हॉटेल येथे गेले होते. त्यावेळी मिलिंद शिनगारे याने हॉटेलमध्ये पाण्याची गुळणी केली. या कारणास्तव हॉटेल मालक राजेंद्र बाळासाहेब पोपळे याने मिलिंद शिनगारे यास शिवीगाळ करून मारहाण केली आणि खुर्चीवरून खाली ढकलून दिले. त्यामुळे मिलिंद शिनगारे खाली पडला आणि त्याच्या तोंडाला फेस आला. यावेळी मिलिंद शिनगारे बेशुद्ध पडला.
त्यानंतर राजेंद्र पोपळे यांनी नोकराला सांगून मिलिंद यास हॉटेल बाहेर आणून टाकले. त्या नंतर दोन ते अडीच तासांनी अमोल पोपळे तेथे आला आणि त्यांनी मिलिंद शिनगारे याच्या शरीराला हात लावून पाहिले. मिलिंद शिनगारे हा हालचाल करीत नसून तो मरण पावल्याचे लक्षात येताच त्यांनी मिलिंद शिनगारे यांच्या नातेवाईकांना फोन करून माहिती दिली. त्या नंतर मिलिंद शिनगारे यांची बहीण वैशाली तुपारे आणि त्यांचे नातेवाईक हॉटेलवर गेले आणि त्यांनी मिलिंद शिनगारे यांच्या मृत्यूची चौकशी केली. त्याला उपचारासाठी दवाखान्यात का नेले नाही? असे विचारले म्हणून राजेंद्र पोपळे यांनी त्यांना अर्वाच्च व जातीवाचक शिविगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी मिलिंद शिनगारे यांच्या मृत्यूस राजेंद्र पोपळे आणि अमोल पोपळे हे त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिनगारे यांच्या कुटुबियांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
त्यानंतर मिलिंद शिनगारे यांच्या मृत्यूला दीड महिना उलटून गेल्या नंतर दि. १७ मे रोजी मयत मिलिंद शिनगारे याची बहीण वैशाली तुपारे हिच्या फिर्यादी वरून हॉटेल शिवनेरीचे मालक राजेंद्र पोपळे आणि त्याचा भाऊ अमोल पोपळे यांच्या ॲट्रॉसिटीसह मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक करीत आहेत.
अधिक वाचा :