मराठीला अभिजात भाषेचा दर्जा Pudhari Photo
महाराष्ट्र

'अभिजात' मराठी, वय वर्षे २ हजार पूर्व, विदर्भाने दिला मराठीच्या प्राचीन वयाचा दाखला

पुढारी वृत्तसेवा

मायबोली मराठी अभिजात (Marathi Abhijat Bhasha) ठरवण्यासाठी तिचे प्राचीन वय सिद्ध करणे आवश्यक होते. आणि शोधून शोधूनदेखील वयाचा पुरावा मिळत नव्हता तो मराठीइतकेच प्राचीन असलेल्या वाशिम तथा वत्सगुल्मनगरने दिला.

पश्चिम विदर्भाच्या या ऐतिहासिक शहरातून महाकवी गुणाढ्य यांच्या कवितेने मराठीचा अभिजात मार्ग मोकळा केला. मायबोलीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास साहित्य अकादमीने मंजुरी दिली आणि आता केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून घोषणा तेवढी बाकी आहे. केंद्र सरकारने आजपर्यंत संस्कृत, तेलुगू, तामीळ, मल्याळम, कन्नड, उडीया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

या प्रभावळीत आता मायबोली मराठीही दिसेल. अर्थात मराठीला या अभिजात रांगेत बसवण्यात वाशिम येथील महाकवी गुणाढ्य यांचे योगदान मोठे असेल. कोणत्याही अभिजात भाषेला दर्जा देण्यासाठी केन्द्र सरकारचे काही निकष आहेत. भाषेचे वय, त्या भाषेमध्ये श्रेष्ठ साहित्य निर्मिती, भाषेमध्ये खंड जरी पडला तरी मूळ रूप आणि त्यामध्ये संगती असावी, तिचे अस्तित्व स्वतंत्र असावे, असे हे निकष आहेत.

मराठी भाषा ही ११ व्या शतकातील आहे असे आजपर्यंत मानले जात होते. परंतु वाशीमचे महाकवी गुणाढ्य यांनी नोकरीनिमित्त जम्मू काश्मिरात जाऊन तेथील राजदरबारी सेवा चाकरी करत बृहकथा हे महाकाव्य लिहिले. या काव्यातच मराठीचे आद्यरुप असलेली पैश्याची भाषा आली आहे.

या बृह‌कथाचे सोमदेव यांनी संस्कृत भाषेत ११ व्या शतकात भाषांतर केले. त्यामध्ये महाकवी गुणाढ्य यांची पूर्ण बायोग्राफी दिली. त्याचे मराठीत भाषांतर ह.अ. भावे यांनी कथासरित्सागर या नावाने ५ खंडांत केले. त्याला प्रस्तावना दुर्गा भागवत यांनी दिली होती. रामायण, महाभारत महाकाव्यानंतर बृहकथा हे जगातील प्रसिध्द असे तिसरे महाकाव्य होय. आणि ते २००० वर्षापूर्वीचे आहे हे सर्व प्रमेयासह आम्ही आमच्या अहवालासोबत जोडले. मराठी शब्द, वाक्प्रचार, म्हणी यामुळे मराठी भाषेचे अस्तित्व २००० वर्षापूर्वीचे आहे हे सिध्द करण्यास आम्हाला या महाकाव्याची प्रामुख्याने मदत झाली.

मराठीचा प्रवास या महाकाव्याने सुस्पष्ट होतो. सुरुवातीला पैश्याची, त्यानंतर महाराष्ट्री प्राकृत आणि त्यानंतर मराठी असा मायबोलीचा प्रवास झाला. आजपर्यंत मराठी भाषा ही संस्कृत भाषेची मुलगी मानली जात होती पण यामुळे मराठी भाषा ही संस्कृतइतकीच जुनी व स्वतंत्र असल्याचे सिध्द झाले. मराठीमध्ये साहित्य निर्मिती संदर्भात तर बोलायलाच नको. महाकवी गुणाढ्य, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव यांच्यासारख्या दिग्गजांच्या साहित्यांनी मराठी भाषा समृध्द झाली.

यासोबतच शिवनेरी या सह्याद्री पर्वताच्या रांगेत नाणेघाटमध्ये ब्राम्ही लिपीमधील २००० वर्षापूर्वीचे शिलालेख आढळले. त्यामध्ये मराठी महारथीनो असे शब्द आहेत. तामीळमधील संगम साहित्य या २५०० वर्षापूर्वीच्या साहित्यात मराठी गवंडी कावेरी घाटावर चांगले काम करतात असा उल्लेख आहे. महाराष्ट्री प्राकृत आणि आजची मराठी यावर अनेक मान्यवरांच्या संशोधनाचे दाखले देण्यात आले. श्रीधर केतकर, राजाराम शाखी भागवत, लक्ष्मण पांगारकर, वा. भि. मिराशी यांचे संशोधन, त्यांच्या ग्रंथाचे दाखलेही दिले.

मराठी भाषेमध्ये श्रेष्ठ साहित्यनिर्मिती होती, ती स्वतंत्र अशी भाषा होती, तिचे स्वतंत्र अस्तित्व होते, पण तिच्या वयाच्या संदर्भात पुरेसा पुरावा उपलब्ध नव्हता. तो पुरावा वाशीम येथील महाकवी गुणाढघ यांच्या बृहद्ङ्कथा या महाकाव्यामुळे मिळाला. सतत वेगळे निघण्याची भाषा विदर्भात होते, परंतु स्वतंत्र विदर्भाच्या या भाषेत वन्हाड कधीच गेले नाही आणि वाशिम त्याच वन्हाडचा भाग आहे. उद्या अभिजात मायबोलीची मिरवणूक निघेल तेव्हा या दर्जाचे श्रेय सर्वांत पुढे असणाऱ्या वन्हाडच्या वाशिमला द्यायला हवे.

पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना २०१३ मध्ये रंगनाथ पठारे समितीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण यांनी तत्कालीन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्रीपाद नाईक यांना पत्र लिहून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर तो प्रस्ताव भाषा तज्ज्ञ समितीकडे पाठविण्यात आला होता. समितीने अभिजात भाषेसाठी मराठीची शिफारस केली.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी २०१७ मध्ये मंत्रिमंडळाच्या मसुद्यावरील आंतर-मंत्रालयीन सल्लामसलत करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर अभिजात भाषेसंबंधी निकष काय असावेत यासंबंधी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय निर्णय घेते. आतापर्यंत ज्या भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यांची नोंद भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात करण्यात आली आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व भाषातज्ज्ञ प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीत स्व. प्रा. हरी नरके, श्रीकांत बहुलकर, नागनाथ कोतापल्ले, सतीश काळसेकर, कल्याण काळे, मधुकर वाकोडे, मैत्रेयी देशपांडे, आनंद उबाळे आदी तज्ज्ञांचा समावेश होता.

सुमारे ४६७ पानी अहवाल या समितीने केंद्राला सादर केला. मराठीची भाषा किती प्राचीन व श्रेष्ठ आहे याचे दाखले देण्यात आले. मराठीतील समृध्द साहित्य परंपरेची माहितीही देण्यात आली. साहित्य अकादमीच्या बैठकीत देश-विदेशातील भाषा तज्ज्ञांच्या उपस्थितीत या अहवालावर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस करणारा अहवाल अकादमीने केंद्राला पाठवला. पठारे समितीने दिलेल्या अहवालातील बारकावे सांगणारा स्व. हरी नरके यांचा लेख दैनिक पुढारीच्या मुंबईत आवृत्तीत ६ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रसिद्ध झाला होता. आज मराठी अभिजात भाषा जाहीर होताच त्यांच्या या लेखाचे हे पुनःस्मरण.

अभिजात भाषेच्या दर्जामुळे कोणते फायदे मिळतात ?

  • अभिजात भाषेतील अभ्यासकांना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.

  • अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येते.

  • प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केले जाते.

माय मराठीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण निर्णय- नितीन गडकरी

माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार व महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन.
- नितीन गडकरी, केंद्रीय महामार्ग मंत्री

सांस्कृतिक वैभव जगभर पोहोचेल - उपमुख्यमंत्री अजित पवार

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची गेल्या अनेक दशकांची मागणी होती. ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे पूर्ण झाली आहे. यासाठी गेली अनेक दशके प्रयत्न करणाऱ्या सर्व मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाल्याबद्दल समस्त महाराष्ट्रवासीयांचे, मराठीभाषकांचे, मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन केले असून यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छाही दिल्या आहेत
सांस्कृतिक वैभव जगभर पोहोचेल - उपमुख्यमंत्री अजित पवार

ऐतिहासिक आणि सोन्याचा दिवस : देवेंद्र फडणवीस

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही अनेक वर्षांची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे खूप खूप आभार. आता आपली मराठी भाषा अभिजात झाली आहे. अत्यंत अभिमानाचा असा सोन्याचा क्षण आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा केला. पुरावे दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातही पाठपुरावा करण्यात आला. अखेर आता मराठी अभिजात बनली आहे.
ऐतिहासिक आणि सोन्याचा दिवस : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन - मुख्यमंत्री शिंदे

अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मनःपूर्वक आभार !
समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT