Sanjay Raut on Mahua Moitra: राज्याच्या राजकारणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चांनी जोर धरला असतानाच आता या वादात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी उडी घेतली आहे. उद्धव ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवरून महुआ मोइत्रा यांनी सोशल मीडियावर उपरोधिक टिप्पणी केली होती. त्यानंतर शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनीही तितक्याच उपरोधिक शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.
सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी)च्या ९ खासदारांपैकी ६ खासदार बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. हे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सत्ताधारी महायुतीवर टीकेची झोड उठवली जात आहे.
याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट केली. त्यांनी उपरोधिकपणे विचारले की, "यूबीटीचे खासदार फक्त १५ कोटी रुपयांत का विकले जात आहेत? आमच्या पक्षातील लोकांना तर ४ कोटी रुपये अॅडव्हान्स आणि पुढील ३६ महिन्यांसाठी दरमहा १ कोटी रुपये मिळत होते."
महुआ मोइत्रांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनीही सोशल मीडियावर प्रत्युत्तर दिले. त्यांनी लिहिले, "नाही नाही महुआजी, प्रत्येक खासदाराचा मिनिमम सपोर्ट प्राइस (MSP) ५० कोटी रुपये ठरवण्यात आला आहे. १५ कोटी रुपये ही तर फक्त आगाऊ रक्कम आहे."
इतकेच नव्हे तर संभाव्य बंडखोर खासदारांवरही राऊत यांनी टीका केली. "खरं सांगायचं तर या लोकांची किंमत ५० हजार रुपयेही नाही. शिवसेना आणि टीएमसीसारख्या पक्षांच्या ब्रँडमुळेच त्यांची किंमत वाढली आहे," असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून गंभीर आरोप केले होते. "महाराष्ट्रातील खासदारांना पक्षांतरासाठी प्रत्येकी १५ कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे," असा दावा त्यांनी केला होता. या आरोपांमुळे उद्धव ठाकरे गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांना आणखी खतपाणी मिळाले.
या सगळ्या घडामोडींना आणखी वेग तेव्हा मिळाला, जेव्हा शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी संभाव्य बंडखोर खासदारांचे स्वागत केले जाईल, असे संकेत दिले. पक्षात येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले होते.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना खासदारांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांमुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात किती खासदार पक्ष बदलतात आणि या घडामोडींचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.