File Photo
महाराष्ट्र

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Maharashtra Legislative Council Election | २७ मार्चला मतदान आणि त्याच दिवशी निकाल

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ५ जागांसाठी पोट निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आला. आमशा पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे विधान परिषद सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, या सर्व जागा आमदारांच्या वतीने निवडल्या जाणाऱ्या आहेत. यासाठी २७ मार्चला मतदान होईल आणि त्याच दिवशी निकाल लागणार आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या निवडणुकीची अधिसूचना १० मार्चला जारी करण्यात येईल. १० मार्च ते १७ मार्च दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडेल. १८ मार्चला अर्जांची छाननी प्रक्रिया होईल. २० मार्चला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे तर २७ मार्चला मतदान होईल आणि संध्याकाळी ५ वाजता निकाल लागणार आहे.

निवडणूक होत असलेल्या ५ जागांपैकी ३ जागा भाजपच्या, १ शिवसेना शिंदे गटाची तर १ अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आहे. महायुतीकडे सध्या आवश्यक संख्याबळ देखील आहे. त्यामुळे या ५ जागांपैकी आताच्या परिस्थितीप्रमाणेच जागावाटप होण्याची शक्यता आहे. मात्र या ५ ठिकाणी महायुतीमधून कोणाला संधी मिळेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीमध्ये अनेक उमेदवारांना विधानसभेत उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र मिळू शकली नाही. अशा प्रमुख लोकांची एक प्रकारे मनधरणी आणि विधिमंडळात समायोजन या माध्यमातून होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT