मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरात पुढील 3 ते 4 तास मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन 24x7 नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. मदतीसाठी नागरिकांनी राज्यस्तरीय टोल-फ्री हेल्पलाइन 1070 किंवा स्थानिक हेल्पलाइन 1077 वर तातडीने संपर्क साधावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
राज्यस्तरीय टोल-फ्री हेल्पलाइन: 1070
मोबाईल: 09321587143
दूरध्वनी: 022-22027990 / 022-22794229
स्थानिक मदतीसाठी हेल्पलाइन: 1077
गरज असल्यास त्वरित संपर्क साधा आणि सुरक्षित राहा.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ६:०० या कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणे
मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर
लोणावळा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्राजवळ जाणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुढील 24 तासांत धरण 80 टक्क्यांहून अधिक भरू शकते. त्यामुळे परिस्थितीनुसार धरणाच्या सांडव्यावरून कधीही पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता असून, नदीपात्रात न उतरता सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि जनावरे व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे पाटबंधारे विभागाने आवाहन केले आहे.
मुसळधार पावसामुळे परंदवाडी–पवना नगर मार्ग बंद
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परंदवाडी रोड ते पवना नगर हा मार्ग सुरक्षिततेच्या कारणास्तव तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईतील मुसळधार पाऊस आणि रेल्वे वाहतुकीतील अडथळ्यांमुळे जगप्रसिद्ध डबेवाल्यांनी आजची सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 125 वर्षांहून अधिक काळ अखंड सुरू असलेल्या या सेवेला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरता ब्रेक देण्यात आला आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कासारसाई धरण : महत्त्वाची सूचना
आज दिनांक ०६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता कासारसाई धरण ७५.६५% क्षमतेने भरले आहे. तरी धरण क्षेत्रात सततच्या पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये वाढ झाल्यास व पाऊस चालू/वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार कासारसाई धरणाच्या सांडव्यावरून कासारसाई नालापात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागेल.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
हे आपल्या माहितीसाठी सविनय सादर.
इंजि.दि.म.डुबल,
कार्यकारी अभियंता,
पुणे पाटबंधारे विभाग ,
पुणे
सततच्या मुसळधार पावसामुळे आळंदी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून इंद्रायणी नदीवरील पूल आणि अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानने वारकऱ्यांना सध्या आळंदीत न येता ज्या ठिकाणी आहेत, तेथेच सुरक्षित थांबण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच पुढील प्रवास करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे, पुढील आदेश येईपर्यंत पुणे-मुंबई दरम्यानची सर्व एसटी बस वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सकाळी पुण्याहून मुंबईसाठी निघालेल्या ४ एसटी बसेस 'उर्से टोल नाका' परिसरात अडकल्या होत्या, त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पुण्यात माघारी बोलावण्यात आले आहे. कृपया प्रवाशांनी सहकार्य करावे आणि रस्ता मोकळा होईपर्यंत प्रवासाचे नियोजन करू नये.
- कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी पुणे विभाग
महामार्ग पोलीस वाहतूक अपडेट: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (मिसिंग लिंक)
कर्जत/लोणावळा परिसरातील दरड कोसळल्याच्या घटनेनंतर 'मिसिंग लिंक' महामार्गावरील ताजी स्थिती खालीलप्रमाणे आहे:
🟢 मुंबईहून पुण्याच्या दिशेने:
मिसिंग लिंकद्वारे मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक आता पूर्णपणे पूर्ववत (सुरू) करण्यात आली आहे.
🔴 पुण्याहून मुंबईच्या दिशेने:
मिसिंग लिंकद्वारे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक अजूनही बंद आहे.
उड्डाणपूल आणि मिसिंग लिंक बंद असल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहने जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने (NH 48) वळवण्यात आली आहेत.
👉 वाहनचालकांसाठी आवाहन: मुंबईच्या दिशेने प्रवास करत असल्यास जुन्या महामार्गाचा वापर करा आणि संयम राखा. सुरक्षेचे नियम पाळा.
- महामार्ग पोलीस
आळंदी येथे मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने सर्व पुलांवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. नागरिकांनी तसेच वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीच्या पात्रालगत जाऊ नये, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.
आज दिनांक 06/07/2026 रोजी पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला असून पुढील 3 तासांसाठी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आणि ताशी 60-70 किमी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे येण्याची दाट शक्यता आहे. मंत्रालय. मुंबई वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.
मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील Tunnel No. 40 (BB EMD) येथे दरड कोसळली आहे. दरड हटविण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असून, मार्ग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, काही गाड्या रद्द तसेच वळविण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासूनच प्रवास करावा.
लोणावळा: 670
भिरा: 609
ताम्हिणी: 580
शिरगाव: 540
आंबोणे: 537
खोपोली: 516
कुंडले: 290
भिवपुरी: 266
खंड: 305
निलशी: 275
ठाकूरवाडी: 115
वांगाव: 207
कोयना: 161
धारावी: 125
शिरवटा: 219
वलवण: 442
लोणावळा: 495
डोंगरवाडी: 451
दावडी: 474
मुळशी: 230
पोफळी: 190
निमगिरी: १२१.५
माळीण: ६३.५
भोर: ५५.५
दापोडी: ४३.५
राजगुरूनगर: ४२.५
डुडूळगाव: ३९
नारायणगाव: 30
शिरूर: २२.५
लवळे: १५.५
हवेली: १४.५
तळेगाव: ३.५
बारामती: ३.४
दौंड: २.५
जिल्ह्यातील पाऊस (ताजी आकडेवारी) 6 जुलै सकाळी 9 पर्यंत
चिंचवड - 206.5
भोर - 172.0
पाषाण - 113.0
दडुडूळगाव - 110.0
शिवाजीनगर - 108.4
निमगिरी - 99.0
एनडीए - 98.5
राजगुरूनगर - 95.0
दापोडी - 93.0
माळीण - 83.0
शिरूर - 74.5
हवेली - 54.0
दौंड - 45.0
बारामती - 15.6
सातारा जिल्ह्यातील ताथवडे घाटात डोंगरावरील दगड एका कारवर कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे डोंगरातील दगड सैल झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रशासनाने नागरिकांना घाट रस्ते, डोंगराळ भाग आणि पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे किंवा रस्त्याने प्रवास करण्यापूर्वी संबंधित विभागांकडून अद्ययावत माहिती घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सरकारी, महापालिका आणि खासगी शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सावित्री, पाताळगंगा आणि भोगावती नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहरातील काही भाग आणि बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी शिरले असून खोपोली-पेण महामार्गही पाण्याखाली गेला आहे. काही गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण, नागोठणे आणि परशुराम घाट परिसरात दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून काही प्रवासी 10 ते 12 तासांपासून महामार्गावर अडकून पडले आहेत. प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरू आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ दरड कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे दोन्ही दिशेची वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. जुना मुंबई-पुणे महामार्गही पावसामुळे प्रभावित झाला असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कर्जत-लोणावळा दरम्यानच्या भोर घाटात दरडी कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळांवर माती आणि मोठे दगड आल्याने अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून काही गाड्या उशिराने धावत आहेत. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी सतत पडणाऱ्या पावसामुळे कामात अडथळे येत आहेत.
राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोकणातील अनेक भागांत गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून रेल्वे, महामार्ग आणि शहरांतील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.