महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासांत 513 मिमी (20 इंच) विक्रमी पावसाची नोंद झाली असून सातारा जिल्ह्यात पूर, दरडी कोसळणे, रस्ते खचणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या आहेत. खंडाळा तालुक्यातील अतिट गावात ढगफुटीसदृश्य पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरून शेती आणि मालमत्तेचे नुकसान झाले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्र्यंबकेश्वरसाठी रेड अलर्ट कायम आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, एका अपूर्ण पुलाचे नुकसान झाले असून त्याची पाहणी केली जाणार आहे. त्र्यंबकेश्वर शहरात मोठा पूर आला नसला तरी काही ठिकाणी पाणी साचले असून ते लवकरच हटवण्यात येणार आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळून महामार्गावर माती आणि दगडांचा ढिगारा साचला. शहापूर आपत्ती व्यवस्थापन पथक, कसारा पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने कारवाई करत तासाभरात मलबा हटवून वाहतूक पूर्ववत केली. मात्र, परिसरात पाऊस सुरू असल्याने पुन्हा भूस्खलनाचा धोका कायम असून वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी–कसारा घाट परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत दरड हटवण्याचं काम सुरू केलं. वाहनचालकांनी घाट परिसरातून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी तसंच हवामान आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आले आहे.
लोणावळा-कर्जत दरम्यान ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिनदरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक प्रभावित झाली आहे. मध्य रेल्वेने 7 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतचा अद्ययावत तपशील जाहीर केला आहे.
14 एक्स्प्रेस गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
1 गाडी अंशतः रद्द करण्यात आली आहे.
5 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
3 गाड्या पुण्यापर्यंतच धावणार आहेत.
3 गाड्या पुण्याहूनच सुटणार आहेत.
1 गाडीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
रद्द झालेल्या गाड्यांमध्ये डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी इंटरसिटी, पुणे-सोलापूर इंटरसिटी आदी महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.
तर सीएसएमटी-नांदेड एक्स्प्रेस 7 जुलै रोजी नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने दुपारी 3.15 वाजता सुटणार आहे.
मध्य रेल्वेने प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत माध्यमांवर गाड्यांची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.
नाशिकमध्ये ढगफुटीचा धोका टळला असला तरी मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील २४ तासांत ३०० मिमीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून नाशिकमधील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी मंदिर आज भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
मुंबई शहर व उपनगरात अधूनमधून पाऊस सुरू राहील. शहर आणि उपनगर परिसरात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. अधूनमधून ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही दाट शक्यता आहे.
मुंबई–गोवा महामार्गावर मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचणे आणि दरड कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कशेडी घाटाला भेट दिली. यावेळी त्यांनी दरड हटविणे, रस्ता पूर्ववत करण्याचे काम आणि वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली. संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आणि वाहतूक शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्याचे निर्देश दिले.
खडकवासला धरणात मुसळधार पावसामुळे पाणीसाठा 76 टक्क्यांवर पोहोचला असून पुढील काही तासांत धरण 80 टक्क्यांहून अधिक भरू शकते. त्यामुळे धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे आणि जनावरे व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे पाटबंधारे विभागाने आवाहन केले आहे.
दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक तब्बल 19 तासांनंतर पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दरड हटवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
मुंबईत सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट कायम आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीबाबत अधिकृत अपडेट तपासूनच घराबाहेर पडावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
मुंबईत पावसाचा जोर कमी झाला असला तरी नालासोपारा आणि विरार परिसरात अनेक रस्ते, दुकाने आणि गृह संकुलांमध्ये अजूनही पाणी साचलेले आहे. काही ठिकाणी नागरिकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागत असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पावसाचा जोर कमी झाल्याने अंधेरी सबवेवरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. सध्या येथे पाणी साचलेले नसून वाहनांची नियमित ये-जा सुरू आहे.
उत्तर मुंबईतील मनोरी किनाऱ्याजवळ एक मानवरहित व्यापारी जहाज किनाऱ्यावर अडकले आहे. घटनेनंतर भारतीय तटरक्षक दलाने घटनास्थळी पथक पाठवले असून जहाज अडकण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मरीन लाइन्स परिसरात आज सकाळी कोरडे रस्ते, ढगाळ वातावरण आणि जोरदार वाऱ्यांचे चित्र पाहायला मिळाले. सलग पावसानंतर नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली वसई रोड ते विरार दरम्यानची लोकल रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सहकार्याबद्दल आभार मानले असून सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरडी कोसळणे आणि पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे पश्चिम रेल्वेने पुणे-भुज, भुज-पुणे एक्स्प्रेससह काही MEMU गाड्या रद्द केल्या आहेत. विरार-सुरत सेवा वलसाड येथून सुरू करण्यात आली असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेची माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सततच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अवघ्या 24 तासांत धरणसाठ्यात लक्षणीय वाढ होऊन एकूण साठा 28.92 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.
सलग सात दिवस मुसळधार पावसानंतर मंगळवारी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शहरात रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला असून सकाळी ढगाळ वातावरण, जोरदार वारे आणि काही ठिकाणी हलक्या सरींची नोंद झाली. मात्र हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे.