नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलन सरावासाठी देशातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) २०० स्वयंसेवक दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १२ आणि गोव्यातील २ असे एकूण १४ स्वयंसेवक आहेत. महाराष्ट्रातील नंदुरबारची सुनिता गुलाले आणि नांदेडची अभिग्या मानुरकर या दोघींचा पथसंचलनासह सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही समावेश आहे. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएसच्या सराव शिबिराला सुरुवात झाली.
दरम्यान, कर्तव्यपथावर या सर्व स्वयंसेवकांचा कसून सराव सुरू आहे. २०० स्वयंसेवकांपैकी सर्वोत्तम १४८ स्वयंसेवक कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी पथसंचलन करतील. हे सर्व स्वयंसेवक देशाच्या राष्ट्रपती दौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटणार आहेत आहेत.
एनएसएस तुकडीने सर्वप्रथम राजधानीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सरावाला सुरुवात केली. त्यानंतर गुरुवारपासून कर्तव्यपथावर सरावाला सुरुवात केली. हे शिबिरार्थीं परेड संचलन सरावासह बौद्धिक सत्र, योग, कवायत, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी आहेत. सदर शिबिर ३१ जानेवारी २०२५ पर्यंत चालणार आहे. यादरम्यान दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ठरलेल्या वेळापत्रकानुसार २०० स्वयंसेवक विविध गोष्टींचा सराव करतात. हा सराव खडतर असतो त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आणि खानपानाची विशेष काळजी घेतली जाते, अशी माहिती महाराष्ट्रातून एनएसएसच्या स्वयंसेवकांना घेऊन येणारे प्राध्यापक डॉ. पवन शिनगारे यांनी दिली.
तेजस सोनसरे- नागपूर , हरीओम इंगळे- जळगाव , स्वरूप ठाकरे- नाशिक, गुरुप्रसाद सातोने- वर्धा , आदित्य चंदोला- मुंबई , निषाद धर्मराज- मुंबई, कविता शेवरे- नाशिक, वेदिका राजेमाने- पुणे, पूजा बोंडगे- पुणे, सुनीता गुलाले- नंदुरबार, अभिग्या मानुरकर- नांदेड, लीना आठवले- अकोला तर गोवा राज्यातून प्रवरी येथील फाल्गुन प्रिहोळकर आणि खंडोला येथील अक्षता कळसगावडर या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे.
दै. पुढारीशी बोलताना नंदुरबारची सुनिता गुलाले म्हणाली की, दुर्गम भागात आमचे महाविद्यालय आहे. मात्र यानिमित्ताने पहिल्यांदाच राष्ट्रीय राजधानीत पथसंचलनासाठी सराव करत आहोत. अनेक दिग्गजांसमोर आम्ही पथसंचलन करणार आहोत, ही भावना खूप मोठी आहे. हा अनुभव समृद्ध करणारा आहे, खूप शिकवणारा आहे.
तर नागपूरचा तेजस सोनसरे म्हणाला की, महाविद्यालयात नेहमीप्रमाणे सराव व्हायचा. राजधानीमध्ये सराव करत असताना इथला स्तर खूप कठीण आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवले जाते. आपण राजधानी दिल्लीत परेडचा भाग असणार आहोत, हा एक मोठा आनंद आहे. आमच्या घरातून पहिल्यांदाच कोणीतरी अशा गोष्टींसाठी दिल्लीत येत आहे, याचा माझ्यासह कुटूंबियांनी मोठा आनंद आहे.
गोव्याचे प्रतिनिधित्व करत असलेले अक्षता कळसगावडर आणि फाल्गुन प्रियोळकर म्हणाले की, महाविद्यालयात करत असलेल्या सरावापेक्षा दिल्लीत करत असलेल्या सरावाचा स्तर कठीण वाटतो. सोबतच काही वातावरणीय बदल अनुभवायला मिळत आहेत. कडाक्याची थंडी आहे. वेगवेगळ्या राज्यांमधून विद्यार्थी येथे आले आहेत. यामध्ये गोव्यातून आम्ही दोघे राष्ट्रीय स्तरावर निवडले गेलो, याचा अभिमान आहे.
या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी निवड पद्धतीही कठीण आहे. साधारण ५ टप्पे या निवड प्रक्रियेमध्ये असतात. सुरुवातीला महाविद्यालय स्तरावर, त्यानंतर जिल्हास्तरावर आणि पुढे विद्यापीठ स्तरावर निवड होते. विद्यापीठ स्तरावर निवड झाल्यानंतर राज्य पूर्व संचलनाच्या माध्यमातून राज्य स्तरावर निवड होते. त्यानंतर महाराष्ट्र आणि गोव्याचा समावेश होत असलेल्या देशाच्या पश्चिम विभागातून म्हणजेच नॅशनल वेस्ट झोनमधून निवड होते. या ५ टप्प्यांमध्ये अनेक खडतर गोष्टी, आव्हाने असतात.